भारतातील पहिली अद्ययावत स्मशानभूमी पुण्यात

पुणे : महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षाचे सुमारे 7 हजार 390 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी मुख्यसभेत सादर करण्यात आले. या अंदाज पत्रकात वैकुंठ स्मशानभूमी पुनर्विकास ही योजना आखण्यात आली आहे. वैकुंठ स्मशानभूमी अद्ययावत साधनांनी परिपूर्ण असणार आहे. हि भारतातील पहिली अद्ययावत स्मशानभूमी असेल. ‘वैकुंठ’ची सुरुवात ५ जून १९७१ रोजी झाली होती. पन्नास वर्षांनंतर आता वैकुंठ स्मशानभूमीच्या पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे.

वैकुंठ स्मशानभूमी आणि परिसराचे लॅण्डस्केप डिझायनिंग करुन सुशोभीकरण, विद्युतदाहिन्यांची संख्या वाढविणे, वाय-फाय सुविधा, अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्थेत वाढ करणे, महिला व पुरुषांसाठी स्मार्ट स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गरम पाण्याची सुविधा, स्नानगृहे, प्रसादासाठी स्वतंत्र कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता, प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना, निर्माल्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, अस्थी जतन करण्यासाठी लॉकरची सुविधा, ध्वनिक्षेपण व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, कार्यालयाचे संगणकीकरण, ऑनलाइन पास, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. याच धर्तीवर पुढील काळात शहरातील सर्व धर्मांच्या स्मशानभूमीत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
आंबील ओढा पुनर्विकास योजना

आंबील ओढा पुनर्विकास योजना अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आली असून, या योजनेबरोबरच मुळा-मुठा
शुद्धीकरण योजना, मुळा-मुठा नदीच्या ८८ किलोमीटर लांबीच्या काठाचे विकसन याही योजना प्रस्तावित
करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये २५ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबील
ओढ्याला महापूर येऊन निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जीवित हानी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
झाले होते. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्तीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ‘आंबील ओढा पुनर्विकास योजना’
आखण्यात येणार आहे. या योजनेत ओढ्याचे सुशोभीकरण, सीमाभिंतीची बांधणी, पाणी शुद्धीकरण, परिसराचे
लॅण्डस्केप डिझायनिंग आणि जॉगिंग ट्रॅकचे विकसन या कामांचा समावेश आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.