तिरुअनंतपुरम – भारतातील नागरिक करोना संसर्गाविरुद्ध मागील दीड वर्षापासून लढा देत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली.
करोना एकदा होऊन गेला की, अँटीबॉडी शरिरात राहतात. त्यामुळे करोनाची पुन्हा लागण होण्याची शक्यता कमीच, असं बोललं जात होतं. मात्र भारतात सापडलेल्या पहिल्या करोना रुग्णाला पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे.
चीनहून भारतात परतलेली केरळमधील वैद्यकीय विद्यार्थिनी भारतातील पहिली करोना रुग्ण होती. ती पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिला दीड वर्षानंतर करोनाचा पुन्हा संसर्ग झाला आहे. तिची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आहे. पण आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आहे.
तरुणीमध्ये करोनाची लक्षणं नसल्याचं, थ्रिसूरच्या डीएमओ डॉ. के. जे, रिना यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. चीनच्या वुहान युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेत असलेली ही तरुणी जानेवारी २०२० मध्ये भारतात परतली होती. त्यावेळी तिला करोना लागण झाली होती. तीन आठवड्यांतर ती करोनामुक्त झाली होती.