नोलन यांच्या चित्रपटाच्या सेटसमोर भारतीयाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई: हॉलिवूडमधले नावाजलेले दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन आपल्या आगामी ‘टेनेट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईत आले आहेत. या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण मुंबईत सुरू आहे. याच वेळी एका भारतीय व्यक्तीनं चित्रीकरण सुरू असणाऱ्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवानं सेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी या व्यक्तीचे प्राण वाचवले.

सोमवरी दिग्दर्शक नोलन आणि चित्रपटातील कलाकार हे कुलाबा कॉजवे परिसरात चित्रीकरण करत होते. त्यानंतर रॉयल बॉम्बे यॉट क्‍लबमध्ये उर्वरित भागाचं चित्रीकरण सुरु करण्यात आलं. याचवेळी ताज महाल पॅलेस हॉटेलच्या समोर समुद्रात उडी मारून एका व्यक्तीनं जीव देण्याचा प्रयत्न केला. चित्रीकरणासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी प्रसंगावधानता दाखवत या व्यक्तीचे प्राण वाचवले.

त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यातही घेतलं आहे. ‘टेनेट’ च्या चित्रीकरणासाठी नोलन आणि त्यांची टिम काही दिवस भारतात राहणार आहे. एकूण सात देशांत या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. जुलै 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.