महाळूंगे-वराळे रस्त्यासाठी मंजुर निधीच्या “पोस्ट’वॉरनंतर आता रस्त्याचे दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी भूमिपूजन
जिल्हा प्रतिनिधी
पुणे- विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसी खेड तालुक्यातील पक्षीय राजकारण तापु लागले आहे. विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकारही घडतात. अशीच एक घटना चाकण एमआयडीसीतील महाळूंगे-वराळे रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी घडली. या रस्त्याचे शुक्रवारी (दि. 13) जिल्हापरिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते वराळ्याच्या बाजूने भूमीपूजन केले आणि शनिवारी (दि. 14) आमदार सुरेश गोरे यांनी महाळूंगे इंगळेच्या बाजूने याच रस्त्याचे भूमिपूजन केले. एकाच रस्त्याचे राज्याच्या सत्ताधारी पक्षांकडून दोनदा भूमिपूजन करण्यात आले. परंतु या श्रेयवादाच्या लढाईत तालुक्यातील भाजपा-शिवसेनेची अंतर्गत धुसफूस मात्र चव्हाट्यावर आली आहे.
महाळूंगे-वराळे रस्त्याचे काम पुणे जिल्हा नियोजन समितीने 7 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर केला असून पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण केले जाणार आहे. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट हे या समितीचे अध्यक्ष होते. दरम्यान, रस्ता मंजुरी पासून ते भूमिपूजनापर्यंत आमदार सुरेश गोरे व जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे सोशल मीडियावर फ्लेक्स व होर्डींग्ज “वॉर’ जनतेने डोळे भरून पाहिले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील राज्यातील काही आमदार, नेते कार्यकर्ते युती व्हावी म्हणून आग्रही असताना खेडमधील भाजप पदाधिकारी मात्र, युती होऊ नये यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत.
- दोघांच्या पोस्टरमुळे संभ्रम निर्माण
आमदार सुरेश गोरे व बुट्टे पाटील या दोघांच्या “पोस्टर’ मध्ये रस्त्याची नावे वेगवेगळी टाकली होती. सुरेश गोरे यांनी म्हाळुंगे ते वराळे, तर बुट्टेपाटील यांनी वराळे ते महाळुंगे असा उल्लेख केला होता. त्यामुळे कोणता रस्ता आणि कोणी मंजूर केला याबाबत नागरिक संभ्रमात आहे. तसेच नागरिकांमध्ये अशीही मिश्किल चर्चा आहे की गोरेंचा रस्ता महाळूंगेकडून वराळेकडे होईल आणि बुट्टे पाटील वराळेकडून महाळूंगेकडे रस्ता करतील. - मी जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असताना या रस्त्याला शरद बुट्टेपाटलांनी मागणी केल्याप्रमाणे तात्त्विक मंजुरी दिली होती. त्यामुळे हा रस्ता मीच मंजूर केला आहे, आणि मी या रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. आमदार सुरेश गोरे यांनी कार्यक्रमाला यायला हवे होते;परंतु गोरेंच्या मनात काय हे समजत नाही.
– गिरीश बापट, खासदार - मी आमदार या नात्याने रस्ता मंजुरीसाठी पाठपुरावा करुन रस्ता मंजूर केले त्यामुळे रस्त्याचे भूमिपूजन मीच करणार. यापूर्वी इतर कोणी भूमिपूजन केले असल्याचे मला माहिती नाही आणि वराळे येथील कार्यक्रमाचे मला निमंत्रण नव्हते.
सुरेश गोरे, आमदार - खासदार गिरीश बापट यांच्या सहकाऱ्याने या रस्त्याला मंजुरी मिळाली असल्याने त्यांचेच हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मी मागणी केलेल्या बिरदवडी ते महाळूंगे, आंबेठाण ते महाळूंगे व वराळे ते महाळूंगे या तीन रस्त्यांपैकी दोन रस्ते मंजुर झाले असून एक रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
– शरद बुट्टे पाटील, सदस्य, जिल्हा परिषद