नवी दिल्ली :- एखादा क्रीडा संघ निवडताना कोणी ज्योतिषाची मदत घेतली व खेळाडूंचे ग्रहमान पाहून त्याची संघात निवड केली असे सांगितले तर खरे वाटेल का. मात्र, हे सत्य आहे. भारतीय फुटबॉल संघाची कोणत्याही स्पर्धेसाठी निवड करताना एका ज्योतिषाची मदत चक्क संघाचे परदेशी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक करतात.
खरेतर खेळाडूंची निवड त्यांची कामगिरी, तंदुरुस्ती व क्षमता पाहून केली जाते. भारतीय फुटबॉलमध्ये मात्र, स्टिमॅक यांनी भुपेश शर्मा या ज्योतिषाची मदत घेतली व अनेक स्पर्धांसाठी संघ निवडल्याचे समोर आले आहे. खेळाडूंची पत्रिका व कुंडली पाहून निवड केली जात आहे. ही स्थिती सकारात्मक असेल तरच त्या खेळाडूची भारतीय फुटबॉल संघाची निवड होत आहे.
स्टिमॅक गेल्या मोसमात संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी ज्योतिषी भूपेश शर्मा यांची मदत घेतली होती. एवढेच नाही तर ग्रह-तारे योग्य स्थितीत असल्यास ज्योतिषाने खेळाडूंना भारतीय फुटबॉल संघात खेळण्याची संधी दिली गेल्याचे सांगितले जात आहे. गेल्या मोसमात जून महिन्यात आशियाई करंडक पात्रता स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या दोन दिवस आधी स्टिमॅक यांना ज्योतिषी शर्मा यांनी अंतिम 11 खेळाडूंची नावे पाठवली होती, असेही समोर आले आहे.
कोणता खेळाडू सरस कामगिरी करेल, तसेच कोणता खेळाडू अपयशी ठरेल. तसेच संघातील सर्व 11 खेळाडूंची कुंडली काय सांगते व त्यांचे ग्रहमान कसे आहे हे देखील शर्मा यांनी स्टिमॅक यांना सांगतल्याचे उघड झाले आहे. भारतीय फुटबॉल महासंघातील एका उच्चपदस्थ व्यक्तीनेच स्टिमॅक यांची शर्मा यांच्याशी भेट घालून दिली होती.
लाखो रुपयांचे मानधन…
भारतीय फुटबॉल संघ निवडताना स्टिमॅक यांच्यासह निवड समितीचे सदस्य जरी निर्णय घेत असले तरीही शर्मा यांनी सुचवलेल्या खेळाडूंवरच शिक्कामोर्तब केले जाते. शर्मा यांना या कामासाठी काही लाख रुपये मानधनही दिले जाते, असेही सांगितले जात आहे.
महासंघाकडून खुलासा नाही…
शर्मा यांची मदत घेत स्टिमॅक संघ निवडतात याबात अद्याप तरी भारतीय फुटबॉल महासंघाने कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, याबाबत महासंघातील काही सदस्यांनी या पद्धतीला विरोध केला असून त्यांच्यापैकीच एकाकडून हे वृत्त माध्यमांपर्यंत पोहोचले व हा प्रकार उघडकीस आला आहे.