लाहोर :- बांगलादेश संघाला प्रमुख फलंदाज नजमुल शांतो याच्या दुखापतीने मोठा फटका बसला आहे. यंदा सुरु असलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत शांतोवरच बांगलादेशच्या फलंदाजीची संपूर्ण मदार होती. त्याने ते सिद्धही केले होते.
मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या पायाचे स्नायु दुखावले होते. त्याची तपासणी केल्यावर ही दुखापत मोठी असल्याचे समोर आले व त्यामुळेच त्याला मायदेशी पाठवण्यात आले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने 89 धावांनी विजय मिळवला होता, त्या सामन्यात शांतोने अफलातून 104 धावांची शतकी खेळी केली होती. आता या स्पर्धेच्या सुपर फोर गटातील सामन्यांना प्रारंभ झाला असून बांगलादेश संघाला शांतोची उणिव निश्चितच जाणवणार आहे.
बांगलादेशनेही नजमुल हुसेन शांतोच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास यांचा संघात समावेश केला आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया करंडक स्पर्धेमध्ये नजमुल हुसेन शांतो चांगलााच फॉर्ममध्ये होता . त्याने या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये 96.50 च्या सरासरीने 193 धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात शांतोने 89 धावांची खेळी केलीआणि दुसऱ्या सामन्यात 104 धावा केल्या होत्या.