नवी दिल्ली – अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने (jawan movie) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने 550 कोटींचा आकडा गाठला आहे. देशांतर्गत कलेक्शनमध्ये 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘जवान’ (jawan) हा 2023 मध्ये भारतात 300 कोटींचा टप्पा पार करणारा तिसरा बॉलीवूड चित्रपट ठरला आहे.
हा चित्रपट व्यावसायिक मनोरंजन करणारा आहे आणि यात शाहरूख खान अधिकारी आणि चोर अशा दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि औरंगाबाद आदी ठिकाणी झाले आहे. तसेचच, चित्रपटात शाहरुख खानसह विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी, दीपिका पदुकोण यांच्या भूमिका आहेत.
सध्या हा चित्रपट सगळीकडे धुमाकूळ घालत असून, अश्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देखील ‘जवान’चे कौतुक करताना दिसत आहेत. सध्या अरविंद केजरीवाल अमृतसर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे खूप कौतुक केले. केजरीवाल म्हणाले की, “हा चित्रपट मी अजून पाहिला नाही, पण त्यासाठी खूप कौतुक ऐकले आहे.
जसा शाहरुख खान चित्रपटात म्हणतो की कोणी मत मागायला आले तर धर्माच्या नावावर मतदान करू नका.. जातीच्या नावावर मतदान करू नका.. त्यापेक्षा जेव्हा कोणी मते मागायला येईल तेव्हा त्याला विचारा की, माझ्या मुलांना चांगले शिक्षण देणार का? माझे कुटुंब आजारी असल्यास, कृपया चांगल्या उपचाराची व्यवस्था करा? तर ते असे असावे.’ असं यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले.