Indian Air Force : केंद्रशासित प्रदेश लडाखमधील कारगिलमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. भारताच्या सुरक्षेसाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळेच भारतीय वायुसेना आणि लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने मोठा पराक्रम केल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाने C-130J सुपर हर्क्युलस विमान रात्री कारगिल हवाई पट्टीवर उतरवत नवा विक्रम केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
भारतीय वायुसेनेने केलेल्या या पराक्रमाविषयी एक ट्विट केले आहे. याविषयी बोलताना, ‘पहिल्यांदा हवाई दलाचे C-130J विमान रात्री कारगिल हवाई पट्टीवर उतरले आहे. या सरावा दरम्यान टेरेन मास्किंगच्या कामासाठी गरुड कमांडोही तैनात करण्यात आले होते. टेरेन मास्किंग ही एक लष्करी रणनीती आहे, जी शत्रूच्या रडारपासून पर्वत, टेकड्या, जंगले यासारख्या नैसर्गिक वस्तू लपवण्यासाठी वापरली जाते. शत्रूपासून लपून राहून आपल्या कारवाया करणे हा त्याचा उद्देश आहे.” असे सांगण्यात येत आहे.
#WATCH | “In a first, an IAF C-130 J aircraft recently carried out a night landing at the Kargil airstrip. Employing terrain masking enroute, the exercise also dovetailed a training mission of the Garuds,” tweets Indian Air Force.
(Video: Indian Air Force) pic.twitter.com/JHVQ7p6Vxu
— ANI (@ANI) January 7, 2024
कारगिल चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे. अशा परिस्थितीत विमान याठिकाणी लँड करणे अत्यंत कठीण काम आहे. त्यातच हिवाळ्यात हिमवर्षाव हा लँडिंगसाठी अधिक अडचणीचा ठरतो. शिवाय रात्रीच्या वेळी बर्फवृष्टी होत असताना विमान हवाईपट्टीवर उतरवणे जोखमीचे असते. लँडिंगच्या वेळी विमानांना रात्रीच्या अंधारात पर्वत टाळावे लागतातच, शिवाय लँडिंगसाठी केवळ नेव्हिगेशनवर अवलंबून राहावे लागते.
C-130J सुपर हर्क्युलस विमान उड्डाण करण्यासाठी किमान तीन क्रू सदस्य आवश्यक आहेत, ज्यात दोन पायलट आणि एक लोडमास्टर यांचा समावेश आहे. विमानात 19 टन सामान लोड करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाऊ शकते. हे चार Rolls-Royce AE 2100D3 टर्बोप्रॉप इंजिनद्वारे समर्थित आहे. जर त्याच्या वेगाबद्दल म्हटले तर हे विमान एका तासात 644 किमी अंतर पार करू शकते. हे विमान धावपट्टी नसलेल्या ठिकाणावर शॉर्ट टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी देखील सक्षम आहे.