तिरुअनंतपूरम – अर्शदीप सिंग, दीपक चहर व हर्षल पटेल यांच्या अफलातून गोलंदाजीनंतर लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी फटकावलेल्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. (India Won by 8 Wicket) या विजयासह यजमान भारतीय संघाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
विजयासाठी 107 धावांची गरज असताना भारताच्या डावाची सुरुवात मात्र अत्यंत सुमार झाली. कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्याच षटकांत खाते उघडण्यापूर्वीच कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीनेही निराशा केली. तो अनरीच नोर्जेच्या गोलंदाजीवर अवघ्या 3 धावा काढून परतला. त्यानंतर एका बाजूने सलामीवीर लोकेश राहुलने संयमी खेळी करत सूर्यकुमार यादवला साथीला घेत डाव सावरताना संघाला अर्धशतकी मजल मारून दिली.
या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 93 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला. राहुलने नाबाद 51 धावांच्या खेळीत 56 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकार फटकावले. तर, सूर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम राखताना नाबाद अर्धशतक फटकावले. त्याने या खेळीत 33 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा व अनरीच नोर्जे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या दोन संघातील दुसरा टी-20 सामना येत्या रविवारी गुवाहाटीत होणार आहे.
#TeamIndia finish things off in style! 👌 👌
A SIX from vice-captain @klrahul to bring up his FIFTY as India take a 1-0 lead in the 3-match #INDvSA T20I series. 👏 👏 @mastercardindia | @StarSportsIndia pic.twitter.com/6Fh0APf52F
— BCCI (@BCCI) September 28, 2022
तत्पूर्वी, नवोदित डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, अष्टपैलू दीपक चहर व हर्षल पटेल यांच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव 8 बाद 106 असा रोखला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, दीपक चहर व हर्षल पटेल यांच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा डाव 20 षटकांत 8 बाद 106 धावांवर रोखला गेला. त्यांच्या एडन मार्करमने 25, वेन मारनेलने 24 तर तळात केशव महाराजने केलेल्या महत्वपूर्ण 41 धावांच्या जोरावर त्यांना शतकी पल्ला पार करता आला.
#INDvSA 1st T20I : अर्शदीप-चहरचा कहर, दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 107 धावांचे लक्ष्यhttps://t.co/MUBxxW6Kd7
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 28, 2022
एकवेळ 5 बाद 9 अशा दयनिय स्थितीतून त्यांनी जिद्दीने फलंदाजी केली. त्यांच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर चहरने त्यांचा कर्णधार टेम्बा बवुमाला बाद करत थाटात सुरुवात केली. त्यानंतर अर्शदीपने आपल्या पहिल्या व संघाच्या दुसऱ्या षटकात तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
क्वांटन डीकॉक, डेव्हीड मिलर यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजांनी साफ निराशा केली. चहरने नवोदित ट्रीस्तान स्ट्रबलाही बाद करत त्यांना 5 बाद 9 असे अचडणीत आणले होते. त्याचवेळी मार्करमने जिद्दीने फलंदाजी केली व डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो 25 धावांवर बाद झाला. पारनेल व महाराजने किल्ला लढवला. पारनेल 24 धावांवर परतला.
महाराजने आक्रमक खेळी केली. मात्र, अखेरच्या काही षटकांत धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 41 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 35 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 2 षटकार फटकावले. तो बाद झाल्यावर कागिसो रबाडाने 7 तर, अनरीच नोर्जेने 2 धावा केल्या व पूर्ण 20 षटके खेळून काढताना संघाला 8 बाद 106 अशी मजल मारुन दिली. भारताकडून अर्शदीप सिंगने 3, तर दीपक चहर व हर्षल पटेलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. अक्सर पटेलने 1 बळी घेतला.
या सामन्यात नाणेफेकिपूर्वी प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्याच्याजागी हर्षल पटेलला तर यजुवेंद्र चहलच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली.
संक्षिप्त धावफलक :-
दक्षिण आफ्रिका – 20 षटकांत 8 बाद 106 धावा. (केशव महाराज 41, एडन मार्करम 25, वेन पारनेल 24, अर्शदीप सिंग 3-32, दीपक चहर 2-24, हर्षल पटेल 2-26, अक्सर पटेल 1-16).
भारत – 16.4 षटकांत 2 बाद 110 धावा. (लोकेश राहुल नाबाद 51, सूर्यकुमार यादव नाबाद 50, कागिसो रबाडा 1-16, अनरीच नोर्जे 1-32).