भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 23 फलंदाज बाद झाले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 55 धावांत खुर्दा उडवला तर भारताचा डावही 153 धावांवर संपला. पाठोपाठ दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 62 अशी झाली ती देखील सामन्याच्या पहिल्याच दिवशी. म्हणजे फलंदाजांची मानसिकता खराब झाली आहे की खेळपट्टी असाच प्रश्न निर्माण होत आहे.
त्यानंतरही त्यांचा डाव सावरला नाहीच जसप्रीत बुमराहसमोर त्यांचा दुसरा डाव १७६ धावांवर संपला. म्हणजेच या खेळपट्टीवर उभे राहावे असे एकाही फलंदाजाला वाटले नाही याचेच आश्चर्य वाटते. भारताला ७९ धावा करायच्या होत्या मात्र, त्यातही तिन फलंदाज बादजाले यावरूनच येत्या काळात जागतिक क्रिकेटपटू (इंग्लंड व ऑस्ट्रेलिया वगळता) कसोटी क्रिकेटबाबत कीती गंभीर आहेत हेच दिसून येते.
पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघ पेटून उठेल असे वाटले होते व घडलेही तसेच परंतू दक्षिण आफ्रिकेसारखा बलाढ्य संघ अवघ्या 55 धावांत गारद होतो हे जरा पटत नाही. बरे महंमद सिराजने गोलंदाजी झकास केली मात्र तरीही यावर विश्वास बसत नाही की दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना त्याची गोलंदाजीच खेळता आली नाही. जवळपास सगळेच फलंदाज बाहेर जात असलेल्या चेंडूला बॅट लावून बाद झाले आहेत.
दुसरीकडे आपल्या फलंदाजांनी तरी काय दिवे लावले. विराट कोहली वगळता एकही फलंदाज आत्मविश्वासाने फलंदाजी करत नव्हता. लोकेश राहुलने तो अप्पर कट मारण्याचा केलेला प्रयत्न पाहील्यावर त्याला पुढील सहा महिने कसोटी संघातून बाहेर बसवले गेले पाहीजे. 5 बाद 153 वरून आपण सर्वबाद 153 असे गडगडतो. म्हणजेच खेळपट्टी नव्हे तर मानसिकताच खराब झाली आहे.
सेंच्युरीयनच्या पहिल्या कसोटीसाठीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साजेसी होती तीथे हे घडले असते तर समजता आले असते परंतू केपटाऊनचा इतिहास फलंदाजीला पोषक असतानाही हे घडले म्हणजे एकतर आता खेळाडूंना कसोटी क्रिके नकोसे वाटू लागले आहे. दुसरा डाव सुरु झाल्यावरही दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज बाद झाले म्हणजेच कोणत्याही संघाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर पाय घट्ट रोवून उभे राहावे असे वाटतच नाही हेच दिसून आले.
खराब खेळपट्टीवर उपाय शोधता येइल परंतू खराब मानसिकतेच काय उपाय शोधणार. या कसोटी सामन्यानंतर आपण आता इतक्या लवकर कसोटी खेळणार नसल्याने या सामन्याची चर्चा काही दिवस चालेल व एकदा मर्यादीत षटकांचे सामने सुरु झाले की या चर्चाही बंद होतील. तंत्रशुद्ध फलंदाजीवर आपण गेल्या वेळी बोललो आता क्रिकेटवर बोलण्यापेक्षा मानसिकतेवर बोलणे गरजेचे आहे. भारतीय संघाला आता मुख्य प्रशिक्षकाची गरज नसून मानसोपचार तज्ञाची जास्त गरज आहे हेच अंतिम सत्य आहे.