वॉशिंग्टन – अमेरिकेकडून भारताला एमक्यू-९ बी ड्रोन मिळणार असून या ड्रोनमुळे भारताची सागरी सुरक्षा अधिक सक्षम होईल. तसेच सागरी जागरुकतेची क्षमताही वृद्धिंगत होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. भारताला ही ड्रोन विकल्यामुळे भारताबरोबरचे भागीदारीचे संबंध देखील अधिक घट्ट होतील, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रमुख उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
रिमोट कंट्रोलद्वारे वापरण्याजोग्या ३१ एमक्यू- ९ बी ड्रोनची भारताला विक्री करण्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच संसदेला कळवले आहे. या ड्रोनची निर्मिती जनरल ऍटोमिकने केली आहे. ही कंपनी आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या ड्रोनच्या विक्रीबाबत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक प्रमुखांशी चर्चा केली आहे. या ड्रोनची किंमत अंदाजे ३.९९ अब्ज डॉलर इतकी आहे.
या ड्रोनच्या खरेदीसाठी भारताचा अमेरिके सोबत जवळपास ४ अब्ज डॉलरचा करार झाला असून त्यानुसार ३१ अत्याधुनिक एमक्यू-९ बी स्काय गार्डियन ड्रोनच्या संपादनाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या ड्रोनमुळे भारताच्या संरक्षण क्षमतामध्ये १६ पट वाढही होईल. हा ड्रोन खरेदीचा करार भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संरक्षण विषयक संबंधाचा एक भाग आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेकडून ड्रोन खरेदीच्या भारताच्या योजनेचे स्वागत केले होते.
एमक्यू-९ बी ड्रोनची बांधणी भारतात केली जाणार असल्यामुळे भारतातील संरक्षण क्षमताही वाढणार आहे. यूएस-भारत संयुक्त निवेदनानुसार जनरल ऍटॉमिक्स भारतात सर्वसमावेशक जागतिक एमआरओ सुविधा देखील स्थापन करणार आहे. या कराराद्वारे अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांना भारतीय समुद्रामध्ये दुरुस्ती आणि देखभालीसाठी येणे शक्य होणार आहे.