बंगळुरू – भारताने शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी एक अब्ज डॉलर (सुमारे 83 अब्ज रुपये) खर्च केले पाहिजेत. त्यासाठी जगभरातून 10 हजार अत्यंत सक्षम सेवानिवृत्त शिक्षकांना बोलावावे लागणार आहे, असे मत इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी एका कार्यक्रमात मांडले.
नारायण मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, यासह 2500 ट्रेन द टीचर्स कॉलेज उघडावे लागतील, जेणेकरून आमच्या शिक्षकांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामध्ये अधिक चांगले प्रशिक्षित करता येईल. चार शिक्षकांचा संच एका वर्षात 100 प्राथमिक आणि 100 माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देऊ शकतो. या प्रक्रियेद्वारे वर्षाला 2.5 लाख प्राथमिक आणि 2.5 लाख माध्यमिक प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. केवळ हा अभ्यासक्रम पुरेसा नाही, तो प्रशिक्षण कार्यक्रम एक वर्षाचा असावा, असेही मत त्यांनी यावेळी मांडले.
भारतात विविध प्रकारच्या सूचना येतात आणि मला खात्री आहे की आमच्याकडे तज्ञांचा एक गट आहे जो त्या सूचनांचे विश्लेषण करेल. ते सार्थकी लागले तर ते हे कार्य पुढे नेऊ शकतात. त्यामुळे देशाच्या हिताच्या भावनेने दिलेल्या या सर्व सूचनांचे स्वागतच केले पाहिजे असे मला वाटते, असेही ते यावेळी म्हणाले.