बर्मिंगहॅम – युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाई चानूनंतर जेरेमीने वेटलिफ्टिंगमध्ये स्वप्नवत कामगिरी केली. युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमीने 67 किलो वजनी गटात एकूण 300 किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये 140 किलो वजन उचलत त्याने राष्ट्रकुलमधील विक्रमही स्थापित केला. त्याचवेळी जेरेमीने क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलले.
जेरेमीने 300 किलो वजन उचलून राष्ट्रकुल विक्रम केला. रौप्यपदक सामोआच्या नेवो इओनेने जिंकले. त्याला एकूण 293 किलो वजन उचलण्यात यश लागले. तो अखेरच्या प्रयत्नात 174 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरल्याने जेरेमीच्या पदरात सुवर्ण पडले. नायजेरियाच्या एडिडिओंग जोसेफ उमोफियाने 290 किलो (130 किलो+160 किलो) वजन उचलून कांस्यपदक मिळवले.
India, here’s your second 🥇 medallist from the Birmingham 2022 Commonwealth Games: Weightlifter @raltejeremy 🇮🇳🏋♂️👏#EkIndiaTeamIndia | #B2022 | #TeamIndia pic.twitter.com/HzYnmBj985
— Team India (@WeAreTeamIndia) July 31, 2022
जेरेमीच्या या सुवर्णासह भारताच्या नावावर आता 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 5 पदके झाली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत. मीराबाई आणि जेरेमी यांनी सुवर्ण, संकेत सरगर आणि बिंदिया राणी यांनी रौप्य आणि गुरुराजा पुजारीने कांस्यपदक जिंकले आहे.
आमची युवा शक्ती इतिहास रचत आहे! जेरेमीचे अभिनंदन, ज्याने आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत विक्रमदेखील केला आहे. लहान वयातच त्याने प्रचंड अभिमान आणि गौरव मिळवला. त्याच्या भावी प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले.
जेरेमी हा मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच तो सहभागी झाला आहे. जेरेमीचे वडील ज्युनियर नॅशनल चॅम्पियन बॉक्सर राहिले आहेत. जेरेमी आणि त्याचे 4 भाऊ देखील त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉक्सिंग रिंगमध्ये उतरले. परंतु, जेरेमीने वेटलिफ्टिंग पाहिल्यानंतर वेटलिफ्टर होण्याचा निर्णय घेतला.
जेरेमीच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, 2018च्या युवा ऑलिम्पिकमध्ये त्याने 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले आहे.