I.N.D.I.A Seat Sharing: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने (TMC) राज्यात स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेऊन काॅंग्रेससह ‘इंडिया’ आघाडीला धक्का दिला. त्यानंतर आता आम आदमी पार्टी (AAP) ने देखील पंजाबमध्ये काँग्रेस बाजूला केले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे ‘आप’ने स्पष्ट केले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान म्हणाले की, पंजाबमध्ये आमचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. आम आदमी पार्टीने पंजाबमधील 13 लोकसभेच्या जागांसाठी सुमारे 40 उमेदवार निवडले आहेत. लोकसभेच्या 13 जागांसाठी पक्षाकडून उमेदवारांचे सर्वेक्षण सुरू आहे.
दिल्लीत ‘आप’ आणि काँग्रेसमध्ये युती होणार का?
‘आप’ अजूनही दिल्लीत काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहे. आतापर्यंत येथील सात जागांसाठीचा फॉर्म्युला तयार झालेला नसून, काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती आणि आपच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत बैठक झाली आहे. या काळात दोन्ही पक्षांनी भाजपविरोधात एकजुटीचा पुनरुच्चार केला आहे.
ममता बॅनर्जीं यांनी दिला धक्का –
‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) विरोधी पक्षांच्या युतीला झटका देत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (24 जानेवारी) घोषणा केली की, आम्ही राज्यात लोकसभा निवडणूक एकट्याने लढवू. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील जागावाटपाबाबत त्या म्हणाल्या की, “मी त्यांना (काँग्रेस) जागावाटपाचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी सुरुवातीला तो नाकारला. आमच्या पक्षाने आता बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आसाममधील उत्तर सलमारा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “ममता बॅनर्जींशिवाय ‘इंडिया’ युतीची कोणीही कल्पना करू शकत नाही. ‘इंडिया’ आघाडी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवेल आणि सर्व (भागीदार) त्यात भाग घेतील.