पुणे : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पहाटे चारच्या सुमारास खराडीत पोहोचली. खराडीतून जरांगे पाटील सकाळी लोणावळ्याकडे मार्गस्थ होणार आहे. मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अखेर पुणे शहर पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलनाचा पुण्यातील नियोजित मार्ग बदलण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण यात्रा पुण्यात पोहचल्यावर वाढत्या प्रतिसादामुळे आंदोलकांची संख्या देखील वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून नियोजित पदयात्रेचा मार्ग बदलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार नियोजित मार्ग बदलण्यात आला आहे. त्यानुसार वाहनचालकांनी बदल लक्षात घेत पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.
यापूर्वीचा मार्ग…
मनोज जरंगे पाटील यांचा मोर्चा यापूर्वी पुणे शहरातील जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, पुणे रेल्वे स्टेशन, पुणे आरटीओ ऑफिस येथून जाणार होता. मात्र, या रस्त्यावर अनेक मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यामुळे रुग्णांना अडचण होण्याची शक्यता लक्षात घेता काही प्रमाणात या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नवीन मार्ग…
पुणे पोलिसांकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “मराठा आरक्षण रॅली ही नगर रोडने गुंजन चौक, पर्णकुटी चौक, तारकेश्वर चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी मार्गे पुढे संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, सुर्यमुखी दत्तमंदिर चौक, विद्यापीठ चौक, औंध रोडने सरळ राजीव गांधी पुल मार्गे मार्गक्रमण करणार आहे. तरी, वाहनचालकांनी वर नमुद मार्गाचा वापर न करता इतर पर्यायी मार्गाचा वापर करुन पुणे वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.