मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तृतीयपंथीय, समलैंगिंक, लेस्बीयन महिलांसाठी एलजीबीटी हा स्वतंत्र सेल स्थापन केला आहे. अशा वर्गासाठी एखाद्या राजकीय पक्षाने पक्षात स्वतंत्र सेल स्थापन करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सेलच्या स्थापनेची घोषणा केली. ते म्हणाले की एलजीबीटी घटकांतील नागरीकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना समान अधिकार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सेलच्या प्रमुखपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेल स्थापनेचा मुख्य कार्यक्रम आज पक्ष मुख्यालयात झाला. यावेळी सेलच्या काही अन्य पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
यावेळी एकूण तेरा पदाधिकारी निवडण्यात आले. आम्ही या घटकांतील सर्वच नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अध्यक्षा प्रिया पाटील यांनी सांगितले.