-अमित डोंगरे
मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका वाढला. त्याचा फटका क्रिकेटलाही बसला. या धोक्यामुळे देशात लॉकडाऊन लावले गेले. करोनावर नियंत्रण राखण्यासाठी हे आवश्यक होते मात्र, त्याचा खेळाडूंना तेही क्रिकेटपटूंना जास्त तोटा झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या जवळपास सहा महिन्यांच्या काळात क्रिकेटपटूंना आपापल्या घरातच राहावे लागल्याने त्यांच्या तंदुरुस्तीचा खरोखर बट्ट्याबोळ झाल्याचे आयपीएल स्पर्धेत सिद्ध होत आहे.
जे खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखले जात होते आज त्यांचे वय झाले की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, कॅरन पोलार्ड, रोहित शर्मा, शिखर धवन, सौरभ तिवारी, एबी डिविलियर्स, रॉबीन उथप्पा, सुनील नरेन, पियुष चावला, रवींद्र जडेजा, मुरली विजय, शेन वॉटसन, अमित मिश्रा, ऋषभ पंत, कुलदीप यादव, डेल स्टेन, कॉन्टन डीकॉक, करुण नायर, शेल्डन कोट्रेल, दीनेश कार्तिक, इयान मॉर्गन, डेव्हिड मीलर, यशस्वी जयस्वाल, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, विजय शंकर, मनीष पांडे या स्टार खेळाडूंकडे पाहिल्यावर हेच सिद्ध होतो की त्यांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या तंदुरुस्तीकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही.
आयपीएल स्पर्धेला प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सामन्यंत या खेळाडूंना एकेरी व दुहेरी धावा काढतानाही त्रास होत आहे. चोरट्या धावा काढताना खेळाडू थकत आहेत. हेच धोनी, कोहली, पोलार्ड यांच्या खेळीत दिसून आले. धोनीवर तर प्रचंड टीका झाली. वयाची चाळीशी जवळ आल्यावर असा अपमान का करून घेतोस, असा प्रश्नही त्याला विचारला जात आहे. करोनामुळे क्रीडा क्षेत्र ठप्प झाले होते तेव्हा हेच सर्व खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यावेळी कोहलीसह अनेकांनी आपल्या व्यायामाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावरून असे वाटत होते की जेव्हा स्पर्धा सुरू होतील त्यावेळी त्यांना फिटनेसचा प्रश्न राहणार नाही. मात्र, तसे प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. यंदाच्या
स्पर्धेतील सामन्यांत या खेळाडूंची तंदुरुस्ती पाहिली की ते खात्या-पित्या घरातील वाचत आहेत.
योगासने, प्राणायाम, जीम यांच्या माध्यमातून खेळाडू सहा महिन्यांत सातत्याने चर्चेत येत आहेत मात्र, हा सगळाच दिखावा होता हे आता लक्षात येत आहे. भुवनेश्वर कुमार हा हाडकुळा या पंथातील खेळाडू मात्र, त्याला गोलंदाजी करतानाही जो त्रास झाला तो सगळ्यांनी पाहिला. संघासाठी नियुक्त केलेले फिजीओ तसेच फिटनेस ट्रेनर आता काय करणार हा खरा प्रश्न आहे.
अनेक काळानंतर खेळाडू मैदानात उतरल्यामुळे असे होत असावे असे सांगितले जात असले तरीही सामन्यांच्या निमित्ताने खेळाडूंना फाइव्हस्टार फिटनेस सुविधा गेल्या सहा महिन्यांत मिळालेल्या नाहित हे त्या मागचे खरे कारण असावे. तसेच सोशल मीडियावर जे सो-कॉल्ड कुकींग किंवा रेसिपी शो होत होते त्यामुळेच हे चित्र निर्माण झाल्याचे स्पष्ट लक्षात येत आहे. असो, येत्या काही दिवसांत खेळाडू पुन्हा पूर्ण फिट होऊन आपल्या तंदुरुस्तीने सामने गाजवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.