श्रीगोंदा -तालुक्यातील काष्टी येथील सहकारमहर्षी काष्टी सेवा संस्थेच्या निवडणुकीत नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते यांच्या गटाने सर्व तेरा जागांवर विजय मिळवित सत्तांतर घडविले. त्यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांच्या चाळीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.
सहकारमहर्षी काष्टी सेवा संस्थेच्या तेरा जागांसाठी शुक्रवारी (दि.22) मतदान पार पडले. यावेळी 678 पैकी 674 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी चार वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीत राकेश पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ परिवर्तन मंडळाच्या उमेदवारांनी सरासरी 30 ते 60 मतांच्या फरकाने विजयश्री खेचून आणला. काष्टी सेवा संस्थेची निवडणूक दोन्ही गटांतर्फे प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
संस्थेचे माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी स्वच्छ कारभाराचा दावा करीत तर राकेश पाचपुते यांनी सत्ताधाऱ्यांवर गैरकारभाराचे आरोप करीत निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावली होती. अखेर भगवानराव पाचपुते यांच्या चाळीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात राकेश पाचपुते यांना यश आले. त्यांच्यामागे अनेकांनी अप्रत्यक्षपणे शक्ती उभी केल्याची चर्चा रंगली होती. या निवडणुकीत संस्थेचे माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते, माजी उपाध्यक्ष भास्करराव जगताप, जालिंदर पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला. विजयानंतर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.
विजयी उमेदवार व मिळालेली मते अशी ः सर्वसाधारण मतदार संघ – राकेश कैलासराव पाचपुते (395), बाळासाहेब संभुदेव पाचपुते (369), शहाजी शिवाजी भोसले (367), सुभाष साहेबराव पाचपुते (355), सर्जेराव दत्तात्रय पाचपुते (354), रोहिदास पंढरीनाथ सोनवणे (348), विठ्ठलराव जगन्नाथ काकडे (341), लक्ष्मण ज्ञानदेव पाचपुते (334). अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग – सुनील काळूराम माने (370). महिला राखीव – सुवर्णा मनोहर भोसले (377), अलका संजय नलगे (364). इतर मागास प्रवर्ग – दादा बाबुराव कोकाटे (356). भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रवर्ग – काशिनाथ अप्पासाहेब काळे (360).