सातारा -सातारा तालुक्यातील एका गावातील 11 वर्षीय मुलगी तिच्या भावंडासह सरपण आणायला गेली असता, तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी अरुण कैलास गायकवाड या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी सातारा तालुक्यातील एका गावात राहात असून, ती काल (दि. 21) भांवडांसह गावातील एका मंदिराच्या रस्त्याने सरपण आणायला गेली होती. ती सरपण घेऊन घरी परत जात असताना, पाठीमागून आलेल्या संशयिताने तिच्या डोक्यावरील सरपणाची मोळी खाली पाडली.
तिचे तोंड हाताने दाबून, तिला शेजारच्या उसाच्या शेतात ओढून नेले. तेथे संशयिताने तिच्याशी झोंबाझोबी सुरु केल्याने पीडितेने भीतीने त्याला जोराचा हिसका मारला. त्यामुळे तिची सुटका झाली. ती शेतातून पळून जात असताना संशयिताने तिला पाठीमागून दगड मारल्याने तिच्या पाठीला जखम झाली. ती जमिनीवर पडल्यानंतर तो पळत तिच्याजवळ आला. त्यानंतर संशयिताने तिच्या डोळ्यावर जोरात बुक्की मारल्याने, तिला चक्कर आली. ते पाहून संशयिताने पळ काढला. पीडितेची भावंडे तिचा शोध घेत उसाच्या शेतात आले.
तेथे ती जखमी अवस्थेत पडलेली दिसल्यावर त्यांनी नातेवाइकांना बोलावून घेतले. पीडितेला घरी आणल्यावर तिने नातेवाइकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी उपचारांसाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालया प्रशासनाने पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून संशयिताला बेड्या ठोकल्या.