Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil । दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे.
काही दिवसांपूर्वीच निलेश लंकेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केलं. शरद पवार गटाकडून दक्षिण अहमदनगर लोकसभेतून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, अश्यातच सुजय विखे पाटील यांनी इंग्रजीतून भाषण करण्यासाठी दिलेल्या आव्हानाला नीलेश लंकेंचं प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. निलेश लंके यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे,
भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करन बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान अहमदनगर दक्षिण लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी दिलं होतं.
या टीकेला निलेश लंके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. “सुजय विखे हे श्रीमंत कुटुंबातील आहेत, ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची अशाच पद्धतीने टिंगल करतील, ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे’ असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं.
यावेळी बोलतां निलेश लंके म्हणाले की, “माझ्या समोरच्या उमेदवाराने इंग्रजीतून भाषण करण्याची स्पर्धा लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा.
संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचे आहे. इंग्रजीतून बोलणे महत्वाचे नाही.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसदेत मराठी माणसाचा आवाज उठविला. आपल्या जिल्ह्यातील दिवंगत नेते बबनराव ढाकणे यांचेही शिक्षण कमीच होते. त्यांनी बीडचे जिल्ह्याचे नेतृत्व करताना संसदेत मराठीचा झेंडा लावला होता.’ असं लंके यावेळी म्हणाले.
सुजय विखे काय म्हणाले होत?
नगरचे भाजप उमेदवार सुजय विखेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर टीका करताना त्यांचे शिक्षण काढलं होतं. निलेश लंकेंनी पाठांतर करून का होईना, माझ्याएवढं इंग्रजी बोलावं, मी नगरमधून उमेदवारी अर्ज मागे घेईन असं आव्हान सुजय विखेंनी दिलं होतं. सुजय विखेंच्या या आव्हानावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली.