मुबंई :– भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना येत्या 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीवर असल्याने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, या कसोटीसह चौथ्या कसोटीसाठी प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सातत्याने सामने खेळत असल्याने हा निर्णय बीसीसीआय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
धर्मशाला येथे होणाऱ्या अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी बुमराह संघात परतेल. विशाखापट्टणम कसोटी सामन्यात भारताच्या विजयात बुमराहची गोलंदाजी निर्णायक ठरली होती. त्याने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 3 बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजीची वाताहत केली होती. या सामन्यात बुमराहने 150 कसोटी बळींचा आकडाही गाठला.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल राजकोट कसोटीचा भाग असणार नाही. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचे खेळणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल असे यापूर्वी सांगण्यात आले होते, मात्र आता केएल राहुल खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीमध्ये ‘हा’ युवा खेळाडू करू शकतो पदार्पण, केएस भरतला मिळणार डच्चू….
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिकल तिसऱ्या कसोटीत केएल राहुलच्या जागी खेळणार आहे. वास्तविक, देवदत्त पडिकलचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये अलीकडचा फॉर्म उत्कृष्ट आहे. त्यामुळे देवदत्त पडिकल राजकोट कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो.