राजकोट – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येथे येत्या 15 फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू राजकोटला पोहोचले आहेत. त्यांनी कसून सरावही सुरु केला आहे. इंग्लंडचा संघही तिसऱ्या कसोटीसाठी आज (मंगळवार) राजकोटला पोहोचणार आहे. या सामन्यात भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल कसोटी सामन्यात पदार्पण करेल असे सुचक विधान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केले आहे. जुरेलचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएस भरतला यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, तो फारशी चमक दाखवू शकला नाही. अशा स्थितीत तिसऱ्या कसोटीतून त्याला डच्चू दिला जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. केएस भरतने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, त्याला म्हणावे तसे यश लाभले नाही. तो फलंदाजीतही फारसा यशस्वी ठरला नाही. त्याने १२ कसोटी डावात केवळ २२१ धावा केल्या आहेत.
भरतची फलंदाजी अलीकडे खूपच सुमार राहिली आहे. तसेच त्याचे यष्टीरक्षणही चांगले झालेले नाही. त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आलेला नाही. तर दुसरीकडे जुरेल हा एक नवोदित परंतू प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने उत्तर प्रदेश, भारत अ आणि राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे.
जुरेलने १५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७९० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २४९ धावा आहे. जुरेलने गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. तसेच डिसेंबरमध्ये बेनोनी येथे दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात ६९ धावांची खेळी केली होती. त्यामुळेच त्याला तिसर्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.