– माधव विद्वांस
इतिहासकार, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वमान्य जन्मतिथी निश्चित करण्याचे अभूतपूर्व काम करणारे वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म मुंबई येथे 13 फेब्रुवारी 1896 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्ह्यातील पेण येथे तर माध्यमिक शिक्षण मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये झाले. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिक चौदाव्या वर्षीच त्यांनी जी.आय.पी.ऑडीटमध्ये उमेदवारी सुरू केली व तेथेच 3 महिन्यांत ते टंकलेखन शिकले व लघुलेखन पद्धतीचा अभ्यास करून अलेनब्रदर्समध्ये नोकरीला लागले.
वर्ष 1913 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते लघुलेखन परीक्षेत पहिल्या नंबरने सुवर्णपदक मिळवून उतीर्ण झाले. याच प्राविण्यामुळे शिक्षण संचालक के. जी. कॉव्हर्नटन यांनी त्यांना आपल्या कार्यालयात नोकरीत लघुलेखक म्हणून घेतले. 1937 मध्ये तत्कालीन शासनाने ऐतिहासिक संशोधनासाठी दोन वर्षांकरिता बेंद्रे यांना शिष्यवृत्ती दिली. या कालावधीत ते इंग्लंडला गेले व इंडिया ऑफिस आणि ब्रिटिश म्युझियममधील ऐतिहासिक साधनसामग्रीची टिपणे त्यांनी संग्रहित केली.
वर्ष 1949 मधे त्यांना अधिकार्याचा दर्जा मिळाला. त्याचवेळी मुंबई राज्याच्या शासनाने संशोधन कार्यासाठी बेंद्रे यांना पेशवे दप्तर तपासण्याची परवानगी दिली. वर्ष 1952 मध्ये मद्रास सरकारने तंजावर येथील दप्तरखान्याची तपासणी करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली.
शिवशाहीच्या इतिहासाचा ‘साधनचिकित्सा’ हा बेंद्रे यांचा पहिला ग्रंथ वर्ष 1928 मधे पूर्ण झाला. वर्ष 1960 मधे ‘छत्रपती संभाजी महाराज’ हा त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ होय. संभाजी महाराजांबद्दलच्या रूढ गैरसमजुतींना या चरित्राने धक्का दिला.
शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, संभाजी भोसले (शिवाजी महाराजांचे वडील बंधू), छत्रपती राजाराम राजे, आदिलशहा, कुतुबशहा आणि राजा जयसिंग या व्यक्तिरेखांचा अभ्यास करून लेखन केले. मराठेशाही रुजवण्यास कोणत्या घटना व प्रसंग कारणीभूत ठरले हे शोधून काढले.
‘शिव-चरित्र’ लिहिण्यापूर्वी बेंद्रे यांनी दोन वर्षे इंग्लंडमध्ये व युरोपात वास्तव्य केले होते व ब्रिटिश म्युझियम तसेच युरोपातील विविध म्युझियममधील कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यांनी त्या त्या ठिकाणांहून गोळा केलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे भारतात आणली. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक सत्ये समोर आली. त्यापैकी एक म्हणजे शिवाजी महाराजांची लंडन येथील तलवार ‘भवानी तलवार’ नसून ती ‘जगदंब’ तलवार आहे.
त्यांचे दुसरे महत्त्वाचे संशोधन म्हणजे, वर्ष 1933 मधे प्रसिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र. एका मुस्लीम सरदाराचे चित्र हे शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून समजले जात होते. परंतु एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेन्टाइन यांच्या सांगण्यावरून काढलेले चित्र बेंद्रे यांनी पाहिले व चित्रातील पोषाखावरून हे चित्र मुस्लीम सरदाराच्या पेहरावाहून भिन्न आहे हे दाखवून दिले. 16 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले.