नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी संयुक्त अरब अमिराती दौऱ्यादरम्यान भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आबुधाबीमधील झायेद स्पोर्टस सिटीमधील या समारंभादरम्यान पंतप्रधान यूएईमधील भारतीय समुदायाला संबोधित देखील करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी आज ही माहिती दिली. बीएपीएस मंदिराचे उद्घाटन हा मोदींच्या यूएई दौऱ्याचा प्रमुख कार्यक्रम असणार आहे. या दिवशी अंदाजे २ ते ५ हजार हिंदू भाविक मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या यूएईच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. २०१५ पासूनचा त्यांचा यूएईचा हा सातवा दौरा असेल तर गेल्या आठ महिन्यांतील तिसरा दौरा असेल. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
पंतप्रधान दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकारी शिखर परिषदेत सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी होतील आणि विशेष मुख्य भाषण देतील. २०२२-२३ मध्ये सुमारे ८५ अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापारासह दोन्ही देश एकमेकांचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.
आबुधाबीमधील भव्य स्वामीनारायण मंदिर
बीएपीएस स्वामीनारायण मंदिर हे आबुधाबीमधील आताप्रयंतचे सर्वात मोठे मंदिर असणार आहे. मदिर, संयुक्त अरब अमिरातीमधील पहिले पारंपारिक हिंदू मंदिर,२७ एकरात पसरलेले आहे. या मंदिरासाठीचा भूखंड यूएईच्या नेतृत्वाने देणगी म्हणून दिला आहे. मध्यपूर्वेतील हे पहिले दगडामध्ये साकारलेले हिंदू मंदिर असणार आहे.