पुणे – विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. याअंतर्गत महापालिकेची नाट्यगृहे तसेच दवाखान्यांना आता विजेसाठी सौर उर्जा उपयोगात आणली जाणार आहे. याबाबत महापालिकेने माझी वसुंधरा योजनेत मिळालेल्या निधीतून ८७ लाख रूपयांची निविदा काढली आहे. यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिली.
महापालिकेचा विजेचा खर्च सुमारे २५० कोटींच्या घरात पोहचला असून, त्यात प्रत्येक वर्षी वाढत्या वीज दरामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. यावर पालिकेच्या इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, राज्यशासनाकडून तसेच केंद्राकडून देण्यात येणारे अनुदान मिळविण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत.
या ११ ठिकाणी बसविणार यंत्रणा
– यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
– शरदचंद्र पवार ई- लर्निंग स्कूल, सिंहगड रस्ता
– स्मार्ट सिटी केंद्र, सिंहगड रस्ता
– वारजे हाॅस्पिटल , वारजे
– विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर
– सुतार हाॅस्पिटल , कोथरूड
– पोटे दवाखाना , पद्मावती
– आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी , बालेवाडी
– मासे बाजार, गणेशपेठ
– महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी
– विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी, वानवडी