India vs Australia, AFC Asian Cup Highlights अल रेयान(कतार) :- एएफसी आशियाई करंडक स्पर्धेत येथील अहमद बिन अली स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० असा पराभव स्वीकारावा लागला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने संघाने सुरुवातीला शानदार खेळ केला आणि पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत सामन्यात एकही गोल झाला नाही. उत्तरार्धात ऑस्ट्रेलियन संघाने ५०व्या आणि ७३व्या मिनिटाला गोल करत सामना जिंकला.
भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूच्या चुकीचा फायदा घेत जॅक्सन इर्विनने 50 व्या सामन्यातील पहिला गोल करत ऑस्ट्रेलियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ७३व्या मिनिटाला जॉर्डन बोसने रिले मॅकग्रीच्या उत्कृष्ट पासचे गोलमध्ये रूपांतर केले. ऑस्ट्रेलियन संघाने संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले, मात्र पूर्वार्धात त्यांना एकही गोल करता आला नाही. या सामन्यात भारतीय संघाने बचावात चमकदार कामगिरी केली, पण शेवटी खेळाडू दडपणाखाली आले. याचा फायदा ऑस्ट्रेलियाने घेतला.
Final match result between Australia 🇦🇺 and India 🇮🇳
Australia wins this game 2-0 #AsianCup2023 #HayyaAsia pic.twitter.com/yvdsdrPRlh
— AFC Asian Cup Qatar 2023 (@Qatar2023en) January 13, 2024
भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने गोल करण्याची संधी गमावली. सामन्याच्या १६व्या मिनिटाला त्याने उत्कृष्ट हेडर केले आणि गोल जवळपास निश्चित झाला, पण चेंडू गोल पोस्टच्या बाहेर गेला. छेत्रीला त्याचा फटका लक्ष्यावर ठेवता आला नाही. ब गटातील भारतीय संघाचा हा सर्वात कठीण सामना होता.
यानंतर भारताला उझबेकिस्तान आणि सीरिया यांच्याशी खेळायचे आहे, जे ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमकुवत संघ आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया फुटबॉलमध्ये नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने सहा वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर भारताने दोन वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला.