India Vs Australia, Hockey Test Series :- भारतीय पुरुष हॉकी संघाला मागील सामन्यापेक्षा चांगली कामगिरी करूनही रविवारी येथे पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. शनिवारी पहिल्या सामन्यात भारताला 1-5 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
या सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर होता. पण तिसऱ्या क्वार्टरमध्ये खराब बचावाचा फटका त्यांना सहन करावा लागला. कारण, यजमानांनी तीन गोल करताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
ऑस्ट्रेलियासाठी जेरेमी हेवर्डने (सहाव्या आणि 34व्या मिनिटाला) दोन पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले तर जेकब अँडरसन (42वे मिनिट) आणि नॅथन एफ्राम्स (45व्या मिनिटाला) यांनी मैदानी गोल केले.
भारतासाठी जुगराज सिंग (नववे मिनिट) आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग (30व्या मिनिटाला) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 10 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. ही मालिका पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीचा एक भाग आहे, पाच सामन्यांची मालिका 13 एप्रिल रोजी संपणार आहे.