Rachin Ravindra’s Base Price For IPL 2024 : न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने नुकत्याच झालेल्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. किवी अष्टपैलू खेळाडूच्या बॅटमधून तीन शतके झळकली. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू होता. आता माहिती समोर आली आहे की, आयपीएल 2024 साठी होणाऱ्या लिलावासाठी रचिनची मूळ किंमत (Base Prize) निश्चित करण्यात आली आहे.
ईएसपीएन क्रिक इंफो (ESPN cricinfo) च्या रिपोर्टनुसार, IPL 2024 च्या लिलावासाठी रचिन रवींद्रची मूळ किंमत (Base Prize) 50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आता या बेस प्राइज वर आणखी किती बोली लागते आणि कोणती टीम त्याला विकत घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 24 वर्षीय रचिनचे वडील बंगळुरूचे रहिवासी होते. अशा परिस्थितीत बंगळुरू संघ त्याला विकत घेऊ शकेल का? हे पाहण्यासारखे असेल.
विश्वचषक 2023 मध्ये केली दमदार कामगिरी…
रचिनने 2023 मध्ये पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळला, ज्यामध्ये त्याने 10 सामन्यांच्या 10 डावांमध्ये 64.22 च्या सरासरीने आणि 106.45 च्या स्ट्राइक रेटने 578 धावा केल्या. या काळात रचिनने 3 शतके झळकावून सर्वांची मने जिंकली. दरम्यान, किवी खेळाडूने विश्वचषक 2023 स्पर्धेत एकूण 55 चौकार आणि 17 षटकार लगावले आहेत. पहिल्याच विश्वचषकात रचिनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रचिन हा अष्टपैलू खेळाडू आहे जो फलंदाजीसोबतच फिरकी गोलंदाजीही करतो. रचिनने वर्ल्ड कपमध्ये 5.98 च्या इकॉनॉमी रेटने 9 विकेट्सही घेतल्या आहेत.
IPL 2024 Auction : ‘हा’ 23 वर्षीय खेळाडू ठरू शकतो IPL इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर…
रचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द..
रचिन न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतो. सप्टेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रने आतापर्यंत 3 कसोटी, 22 एकदिवसीय आणि 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 73 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 18 डावांमध्ये 45.11 च्या सरासरीने 767 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 145 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजी करताना त्याने कसोटीत 3, एकदिवसीय सामन्यात 11 आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 11 बळी घेतले आहेत.