जुन्नरच्या पूर्व भागात पाणीसाठ्यात वाढ

जलयुक्त शिवारांमुळे पाण्याचा प्रश्‍न मिटला : नेहमीच दुष्काळात असणारे शेतकरी समाधानी

अणे – महाराष्ट्रात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आणि जुन्नर तालुक्‍यातील पूर्व भागातील गावांमध्ये जलयुक्तची कामे झाल्यामुळे या परीसरात पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे.

जुन्नर तालुक्‍यात कुकडी प्रकल्पात असलेली येडगाव, माणिकडोह, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगे, वडज अशी पाच धरणे आहेत; परंतु ही पाच धरणे जुन्नर तालुक्‍यात असली तरी तालुक्‍याच्या पूर्व भागातील राजुरी, उंचखडक, बेल्हा,रानमळा, साकोरी, गुंजाळवाडी, अणे, पेमदरा, नळवणे, शिंदेवाडी, आनंदवाडी या गावांमध्ये पूर्वी पाण्याची अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असायची. तालुक्‍याच्या पूर्व भागात असलेली काही गावे पठार भागावर मोडतात, त्यामुळे धरणाचे पाणी पठारभागावर नेण्यासाठी खूप अडचणी असल्यामुळे या भागातील गावामध्ये सतत दुष्काळच जाणवत होता.

या परिसरात साधारण ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यातच विहिरीची पाण्याची पातळी खालावलेली असायची, त्यामुळे पुढील पाच-सहा महिने गंभीर पाणीटंचाईला सामोरे येथील ग्रामस्थांना जावे लागत होते. अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. रानमळ्यात तर यावर्षी ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा सरकारी टॅंकर चालू होता. काही ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांनी देखील स्वतःच्या खर्चातून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी टॅंकर सुरू केले होते.

या ठिकाणी जाणवत असलेल्या भीषण पाणीटंचाईवर उपाय सुचविला तो या विभागाच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी. राज्य शासनाने सुरू केलेल्या “पाणी अडवा, पाणी जिरवा’ अर्थातच “जलयुक्त शिवार योजना’ ही योजना या परिसरात राबवली, तसेच जागोजागी बंधारे बांधून पाणीसाठा वाढवला. राज्य शासनाच्या या योजनेचे महत्त्व येथील ग्रामस्थाना पटवून, तसेच समजून सांगितले गेले आणि व त्यांनी या परिसरात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत के टी बंधारे, पाझर तलाव, नाला खोलीकरण, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे अशी कामे केली.

गावागावांत असलेला ओढ्यांवर ठिकठिकाणी बंधारे बांधले. यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी या बांधलेल्या के.टी. बंधारे, पाझर तलावामध्ये साचले आणि त्यामुळे या परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यात आली.

बेल्हे-राजुरी गटातील बांगरवाडी, उंचखडक, आनंदवाडी, रानमळा या ठिकाणी असणाऱ्या पाझर तलावाची दुरुस्ती केल्यामुळे पाझर तलावातून होणारी पाणी गळती यावर्षी थांबली आहे, त्यामुळे या गावांमध्ये यावर्षी टॅंकरची गरज भासणार नाही. नळवणे गावातील पाझर तलावाची दुरुस्ती केल्यामुळे गेल्या वर्षी भीषण दुष्काळ असूनही गावाला या तलावातील पाणी पुरले. गटात ठिकठिकाणी जिल्हा परिषदेंतर्गत बांधलेले केटी वेअर बंधारे शंभर टक्के भरले असून पाणीसाठा वाढला आहे.
– पांडुरंग पवार, जिल्हा परिषद सदस्य

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.