नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय विमानांचे आगमन सुरूच आहे. त्यामुळे करोनाबाधित संख्येत वाढ होत आहे, असा दावा दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी बुधवारी केला. त्यातून त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे मानले जात आहे.
मागील काही दिवसांपासून दिल्लीतील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. त्यासाठी आपचे नेते जैन यांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना जबाबदार धरले. अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानतळावरील करोना चाचणीत निगेटीव्ह आढळतात. त्यामुळे त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाते.
मात्र, काही दिवसांनी त्यातील काही करोनाबाधित असल्याचे आढळते. संबंधित कालावधीत त्यांच्यामुळे कुटूंबांमधील इतर सदस्यांनाही संसर्ग होतो. करोनाच्या याआधीच्या लाटेतही आंतरराष्ट्रीय विमानांमुळे बाधित संख्या वाढली, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन हा करोनाचा नवा अवतार आढळला. त्याच्या फैलावाचा वेग अधिक असल्याचेही समोर आले. त्याचा संदर्भ घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याआधीच आंतरराष्ट्रीय विमाने थांबवण्याचे आवाहन मोदी सरकारला केले होते.