रांची – अरविंद केजरीवाल यांना सत्तेची लालसा नाही. त्यांना फक्त देशाची सेवा करायची आहे. मात्र, सध्या देशात अत्यंत घाणारडे राजकारण सुरू आहे. त्यांच्या जेवणावर कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जात आहे. ते काय खातात यावर लक्ष ठेवले जात आहे.
ते मधुमेहाचे रुग्ण असून गेल्या 12 वर्षांपासून दररोज इन्सुलिन घेत आहेत. मात्र तुरुंगात त्यांना इन्सुलिन दिले जात नाही. त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना संपवायचे आहे. ते अरविंद केजरीवाल यांचे विचार समजू शकत नाहीत, असा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांंनी केला.
झारखंडची राजधानी रांची येथे इंडिया आघाडीची महारॉली आयोजीत करण्यात आली होती. यावेळी इंडिया आघाडीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी सुनीता केजरीवाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत गंभीर आरोप केले.
सुनीता केजरीवाल म्हणाल्या, अरविंद केजरीवाल यांना सत्तेचा लोभ नव्हता आणि कधीही असणार नाही. त्यांना फक्त देशाची सेवा करायची आहे. त्यांना देशाला नंबर १ बनवायचा आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सर्वोत्तम काम करून दाखविले आहे.
यात त्यांचा काय दोष आहे, त्यांना कोणत्या कारणासाठी जेलमध्ये डांबले आहे. यातच त्यांची शुगर लेव्हल वाढल्याचा मुद्दा गाजत आहे. केजरीवाल यांना इन्सुलिनची गरज आहे.
मात्र, असे असतानाही त्यांना तुरुंगात इन्सुलिन दिले जात नाही. त्यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. भाजप सरकारला माझे पती अरविंद केजरीवाल यांना संपवायचे आहे.
आपचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह म्हणाले, तेजस्वी यादव बिहारमधील भाजपचे दुकान बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रियांका चतुर्वेदी आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रात गुंतला आहे. मला सहा महिने तुरुंगात ठेवण्यात आले.
माझ्या पक्षाचे अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनीही भाजपवर सडकून टिका केली.