बंगळूर – कर्नाटक मंत्रिमंडळात गुजरातसारखा सरसकट बदल होण्याची गरज सत्ताधारी भाजपमधील अनेक आमदारांना वाटत आहे. त्यामुळे कर्नाटक भाजपमधील अस्वस्थता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
सुमारे पाच महिन्यांपूर्वी भाजपने कर्नाटकात नेतृत्वबदल केला. त्यावेळी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, मागील काही दिवसांपासून कर्नाटकात पुन्हा नेतृत्वबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या चर्चा भाजपकडून फेटाळल्या जात आहेत. अशात बोम्मई यांचे राजकीय सचिव असणाऱ्या आमदार एम.पी.रेणुकाचार्य यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमधील अस्वस्थतेकडे लक्ष वेधले आहे.
बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेऊन गुजरात मॉडेलप्रमाणे मंत्रिमंडळ बनवण्याची अपेक्षा आमदार बाळगून आहेत. नव्या चेहऱ्यांबरोबर नव्या कल्पना येतील. त्यामुळे भाजप आणि राज्य सरकारचा करिष्मा वाढेल.
प्रदीर्घ काळापासून काहीच चेहरे मंत्री बनत आहेत, असे ते हुबळीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. काही महिन्यांपूर्वी भाजपने गुजरात मंत्रिमंडळाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला. विजय रूपानी यांच्या जागी भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यांच्या मंत्रिमंडळात एकाही जुन्या मंत्र्याचा समावेश करण्यात आला नाही.