चतुर्थ वार्षिक आकारणीस मुदतवाढ; मलकापूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेत मंजुरी
कराड – मलकापूर नगरपरिषद अंतर्गत मिळकतीच्या सन 2018-19 व 2019-2020 सालच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीस मुदतवाढ देण्यास मान्यता घेत मागील कर आकारणीपेक्षा यावर्षी 19 टक्क्यांनी वाढ करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नगरसेवक राजेंद्र यादव, सागर जाधव, आनंदराव सुतार, नूरजहॉं मुल्ला यांचेसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
नगरपरिषदेस पोलीस यंत्रणेकडून आलेल्या सूचनांप्रमाणे कोल्हापूर नाका ते डी मार्ट दरम्यान असणाऱ्या मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचीत करण्यात आले आहे. तसेच महामार्गालगत असलेल्या सेवारस्त्याच्या दुतर्फा संबंधित व्यापारी, दुकानदार, हातगाडे यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात आल्या.
यामुळे वाहतूकीस होणारी कोंडी फोडण्यास मदत होईल. करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची नाहक ससेहोलपट होत असल्याची तक्रार राजेंद्र यादव यांनी सभागृहात केली. यावर मनोहर शिंदे यांनी संबंधित विभागाने आपल्या कार्यपध्दतीत सुधारणा कराव्यात, अशा सक्त सूचना दिल्या. तसेच एप्रिल पासून नागरिकांना कर भरल्यानंतर जागेवरच ऑनलाईन पावत्या देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शहराचा नावलौकिक जगभर झालेला असतानाही अद्यापही काही नागरिकांकडून स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात नाही. प्लॅस्टिक तसेच कचरा टाकणारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय या सभेत पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया विभाग, कर विभाग, आरोग्य विभाग, आस्थापना विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आभार उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मानले. दरम्यान, या सभेत प्रारंभी शहीद जवान संदीप सावंत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.