पुणे – फिल्म माझे करिअर आहे, नृत्य माझी साधना आहे आणि पॉलिटिक्स माझी सेवा आहे, असे उद्गार अभिनेत्री, नृत्यांगना आणि पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन खासदार हेमा मालिनी यांनी काढले. 35 व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिला महोत्सवाचे उद्घाटन हेमा मालिनी यांच्या हस्ते झाले.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक ऍड. अभय छाजेड, पदाधिकारी कश्यपसिंह चुडासमा, बाळासाहेब अमराळे अतुल गोंजारी, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते. गेली 20 वर्षे मी राजकारणात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयक आणले, त्यामुळे महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण मिळणार आहे. हे फार महत्वाचे आहे, असे हेमा मालिनी म्हणाल्या.
संयोजकांचे कौतुक
या पेंटिंग स्पर्धा आणि प्रदर्शनात अनेक आर्टिस्टने येऊन माझी पेंटिंग बनवली. पण, “ड्रीम गर्ल’वर संपूर्ण प्रदर्शनीच आयोजित केली, याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला महोत्सव सुरू केला. त्यामुळे, पुण्यातील हजारो महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. ही आनंदाची बाब आहे. या महिला महोत्सवात विविध स्पर्धांच्या संयोजकांचे देखील त्यांनी कौतुक केले.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिला महोत्सवातील ब्रायडल मेक अप स्पर्धेच्या संयोजिका दीपाली पांढरे यांनी स्वागत केले, पाककला स्पर्धेच्या संयोजिका करुणा पाटील यांनी प्रास्ताविक केले, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांनी आभार मानले.
नीरजा धिरेन्द्र यांनी सूत्रसंचालन केले. महिला महोत्सवातील पेंटिंग स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या संयोजक ऍड. अनुराधा भारती यांनी हेमा मालिनी यांना हॅंडपेंटेड साडी आणि पंजाबी दुपट्टा भेट दिला.