आजपर्यंत सर्वांगसुंदर पाषाणातील, संगमरवरातील किंवा रांध्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती आपण पाहतो. याशिवाय प्रसिद्ध गणपतींची मंदिरे बांधली आहेत. पण रस्त्यावर असलेल्या झाडामध्ये गणेशाचे रूप दिसले आणि त्याचे मंदिर झाले, असा प्रकार पुण्यात घडला आहे आणि औदुंबर गणपती पूजा याच भक्तीभावातून सुरू झाली आहे. असा गणपती फर्ग्युसन रस्त्यावरील रुपाली हॉटेलशेजारील बोळात गेल्यानंतर अगदी मागच्याच बाजूला दिसतो.
या गणपतीची कोणतीही मूर्ती नाही. औदुंबराच्या झाडाच्या खोडात गणपतीचे रूप दिसते. येथे हा गणपती प्रकट झाला, अशी भावना भक्तांची आहे. उंबराच्या झाडावर जमिनीपासून सुमारे साडेपाच ते सहा फूट उंच अंतरावर गणपतीचे गंडस्थळ, डोळे आणि सोंड दिसून आली. त्याच्या शिरोभागावर भक्तांनी मुकुट बसवले. तसेच डोळे आणि सोंड स्पष्ट व्हावी म्हणून त्याला शेंदूर लेपन करण्यात आले आहे.
या औदुंबराच्या पायाशी गणपतीची मूर्ती स्थापन केली आहे. याशिवाय औदुंबराजवळ दत्त महाराजांचे स्थान असते, अशी पूर्वापार समजूत आहे. त्यानुसार येथे दत्त महाराजांचीही मूर्ती स्थापण्यात आली आहे. या गणेशाच्या सभोवताली भक्तांनी बनवलेली अष्टविनायकांची भित्तीशिल्पे पाहायला मिळतात. या भागातील बहुतेकांना हे स्थान माहीत असल्याने येथे भक्तांची गर्दी पाहायला मिळते.