पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग म्हणून अर्पण करतात. मात्र, नुकतेच गणपतीला भव्य असा 301 किलो मोतीचूर मोदक आणि 131 लिटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण करण्यात आले आहे.
प्रभात फरसाण व दीपक केटरर्सतर्फे दीपक मालाणी, निखिल मालाणी यांनी 301 किलो मोतीचूर मोदक आणि “किगा समूहा’चे संचालक गणेश गोसावी आणि किरण साळुंके यांनी 131 लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण केले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच भक्तांना दोन्ही पदार्थ प्रसाद म्हणून देण्यात आले, असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
याबद्दल गणेश गोसावी म्हणाले, “श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे 131 वे वर्षे असल्याने 131 लिटरचे आईस्क्रीम केले. यासाठी नारळाचा किस, 100 लिटर दूध आणि इतर साहित्य वापरण्यात आले. सुमारे सात ते आठ दिवस आईस्क्रीम तयार करण्यासाठी लागले. तसेच उणे 22 अंशात हे तयार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विविध प्रकारचे आईस्क्रीम बाप्पाला अर्पण करत आहोत.’
तर, मालाणी यांनीदेखील आपल्या उपक्रमाची माहिती दिली.