शेवगाव, (प्रतिनिधी)- पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे सोमवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर लोकार्पण होणार आहे.
जुन्या पंचायत समितीच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे स्थलांतर नवीन प्रशासकीय इमारतीसमोर करावे, अशी तालुक्यातील शिवप्रेमींची इच्छा होती. माजी सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. त्यासाठी भरीव निधीची तरतूदही केली. सध्या हे काम प्रगतीपथावर असून येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी पुतळ्याचे स्थलांतर करून लोकार्पण करण्यात येणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ४ डिसेंबर २०२० ला पुतळा स्थलांतर करण्यास परवानगी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.नवीन जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या ठिकाणी उत्कृष्ट असे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
यामुळे तालुक्यातील शिवप्रेमींना आनंद झालेला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी महेश डोके तसेच विद्यमान गटविकास अधिकारी राजेश कदम, सहाय्यक श्रीराम चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील याकामी जातीने लक्ष घालून योगदान दिले आहे.