नगर, (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर महापालिकेने तब्बल एक कोटी 17 लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. दोन वर्षात 12 हजार 398 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असल्याचा दावा पालिकेने केला. महापालिकेला ठेकेदार मिळेना, त्यामुळे निविदेला चारदा मुदतवाढ देण्यात आली. कुत्री पकडणे आणि त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका 2021 मध्ये पुण्यातील पिपल्स फॉर अॅनिमल या संस्थेला दिला होता. पिपल्स फॉर अॅनिमल या संस्थेवर आरोप झाल्यामुळे आता कुत्री पकडण्यास ठेकेदार तयार होईना.
निर्बिजीकरण केलेला कुठलाही पुरावा नाही. टॅगविना कुत्रे शहारत फिरतात, त्यापोटी कागदोपत्री 1 कोटी 17 लाख रुपये बिल देण्यात आले. परंतु निर्बिजीकरण झालेला कोणताच पुरावा नसल्याने महापालिका पैसे खाते. संस्थेने खोटे काम केल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेला ठेकेदारच मिळेना.
दरम्यान, पालिकेच्या राजकीय वर्तुळातील राजकारणी व मनपाचे काही संबंधित अधिकारी अॅनिमल संस्थेला जाणीवपूर्वक कामात अडथळा आणत असल्याचा आरोप होत असून त्यामुळेच आता ठेकेदारांनीही या त्रासाला कंटाळून निर्बिजीकरणाच्या मोहिमेला रामराम ठोकला आहे.
कुत्र्यांचा विषय महापालिकेत चांगलाच रंगला. त्यानंतर संबंधित संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली, ती मुदतवाढही संपली. नव्याने निविदाप्रक्रिया केली. मात्र, त्या निविदा प्रक्रियेलाही चारवेळा मुदतवाढ देऊन एकाही संस्थेने निविदा भरली नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्री पकडण्यासाठी मनपाकडे यंत्रणाच नाही.
पहिल्या संस्थेवर आरोप झाल्याने ठेकेदार यायला तयार नाही. नगर शहरात सुमारे 25 हजार कुत्री असल्याचा दावा कोंडवाडा विभागाने केला. त्यात 12 हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले, असा दावा करण्यात आला. परंतु याचा कोणताही पुरावा नाही. कुत्री टॅगविना शहरात फिरतात.
मनपाने नव्याने टेंडर प्रक्रिया न केल्याने शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली होती. ही बाब नगरसेवकांनी लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित संस्थेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. त्या संस्थेची तीन महिन्यांची मुदतवाढही संपली, मनपा प्रशासनाने नवीन संस्थेसाठी निविदा प्रक्रिया केली.परंतु, त्या निविदेला चारवेळा मुदतवाढ देऊन कोणीही निविदा भरण्यास उत्सुक नाही.
दरम्यान, सध्या चौकाचौकात कुत्र्यांच्या फौजा फिरत आहेत. नागरिकांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. पुण्यातील पिपल्स फॉर अॅनिमल संस्थेला मोकाट कुत्री पकडणे व त्याचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिला होता. त्या संस्थेने गेल्या दोन वर्षांत 12 हजार 398 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले. त्यापोटी एक कोटी 17 लाखांचे बिल काढल्याचे समजते.
‘टॅगविना”निर्बिजीकरण
नगर शहरात चौकाचौकांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. 2019 च्या गणनेनुसार शहरात सुमारे 25 हजार कुत्री आहेत. यापूर्वी संबंधित संस्थेने कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचा दावा मनपा प्रशासन करीत आहे. सध्या तर कुत्री पकडणारी यंत्रणाच ठप्प आहे.
महापालिका हा चोरांचा बाजार झाला आहे. पालिका कोणालाही ठेका देऊ शकते पण पालिकेला ते करायचं नाही. पालिकेला पैसे खायचे म्हणून ठेकेदार मिळत नाही. महापालिका स्वतःची संस्था तयार करू शकते. परंतु पालिकेला आर्थिक गैरव्यवहार करायचे आहे. विक्रम राठोड, शिवसेना
बिलांसाठी आकडा फुगविला
शहरात 25 हजार मोकाट कुत्री असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. आतापर्यंत 50 टक्के कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले आहे. असे असतानाही शहरात मोकाट कुत्र्यांचे हल्ले सुरूच आहेत. ज्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले ते ओळखायचे कसे? बिले काढण्यासाठी निर्बिजीकरणाचा आकडा फुगविण्यात आला असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.