लाडू-चिवडा महोत्सवाचे साताऱ्यात उद्‌घाटन

सामाजिक बांधिलकीतून “ना नफा, ना तोटा’ तत्त्वावरील उपक्रमाचे 16 वे वर्ष
सातारा – सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने यावर्षीही आयोजित केलेल्या लाडू-चिवडा महोत्सवाचे उदघाटन आज मंगळवारी संस्थेचे संस्थापक गुरुप्रसाद सारडा व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. सामाजिक बांधिलकीतून सलग सोळाव्या वर्षी नागरिकांना दर्जेदार तरीही माफक दरात “ना नफा ना तोटा’ या तत्वावर लाडू- चिवडा उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती सारडा यांनी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील पथावरील मे. प्रभाकर राऊत मिठाईवाले येथे या महोत्सवाचे उदाघाटन झाले. महोत्सव 29 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गेली 16 वर्षे हा उपक्रम साताऱ्यात राबवला जात आहे. त्या माध्यमातून दिवाळी फराळातील लाडू व चिवडा माफक दरात दिला जातो. हे पदार्थ तयार करण्यासाठी हरभरा डाळ, बेसन, साखर, खाद्यतेल, शेंगदाणा, पोहे हा कच्चा माल दर्जेदारच वापरला जातो. पदार्थ तयार करताना सर्व काळजी घेतली जाते. यावेळी पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आणि कामगारांच्या मजुरीची दरवाढ झालेली असूनही चिवडा फक्‍त 110 रुपयात एक किलो, तर लाडू 115 रुपयात एक किलो उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

हे पदार्थ तयार करण्याची व विक्री व्यवस्थेची जबाबदारी मल्हार पेठेतील मे. प्रभाकर राऊत मिठाईवाले फर्मचे भरतशेठ राऊत यांच्याकडे दिल्याची माहिती श्री. सारडा यांनी दिली. ते म्हणाले, “पतसंस्था केवळ सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठीच झटत नाही तर सातत्याने सामाजिक उपक्रम राबविते. प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात संस्था मदतीसाठी आघाडीवर असते. सध्याच्या काळात नागरिकांना दिवाळीत दिलासा देण्यासाठीच “ना नफा, ना तोटा’ तत्वावर लाडू चिवडा महोत्सव आयोजित करत आहे.” गेली 15 वर्षे नागरिकांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला आहे. यावर्षीही नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भरतशेठ राऊत, संस्थेचे अध्यक्ष दिलीप पिलके, उपाध्यक्ष शिवप्रसाद मिणियार, सर्व संचालक आणि कर्मचारी उपस्थित यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.