पावसाचा दुष्काळी भागाला दिलासा

सातारा – जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीला दिलासा मिळाला आहे. या पावसाने खरीप पिकांची हानी होऊन मिळणाऱ्या उत्पन्नाला फटका बसला आहे. सध्या पडत असलेला पाऊस रब्बी हंगामासाठी दिलासादायक असला तरी या पावसामुळे खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

सातारा जिल्ह्याचे मुख्यत्वे दोन भाग पडतात. एक अतिपावसाचा त्यात महाबळेश्‍वर, पाटण, पाचगणी, वाई, सातारा, जावलीचा समावेश होतो. तर, कमी पावसात माण, खटाव, फलटणचा समावेश होतो. प्रारंभीच्या जुनच्या पावसाने पेरणीस पोषक वातावरण तयार होऊन शेतकऱ्यांनी अंदाजे तीन लाख 17 हजार 319 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली.

मात्र निसर्गाचा अंदाज न आल्याने असलेल्या पाण्याच्या साठ्यात म्हणजे धरण, शेततळी, कृत्रिम जलाशयातील पाण्यात पिके जगवण्याची पराकाष्ठा करावी लागली. त्यात काही पिके आली, काही कमी प्रतिची तर काही करपून गेली. कमी पावसाच्या भागात ज्वारी, सोयाबीन, भुईमूग केली जाते तर जास्त पावसाच्या भागात भात तसेच ऊस, आले, हळद यासारखी आर्थिक उत्पन्न देणारी पिके घेतली जातात. पण यावर्षी निसर्गाचे चक्र उलटे फिरल्याने जास्त पावसाच्या विभागात कमी पाऊस पडला त्यामुळे भात, ज्वारीचे अपरिमित नुकसान झाले.

याच सुमारास शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमूग, घेवडा जे काही पीक हाती लागले होते ते काढून ठेवले होते. परंतु हस्त नक्षत्राच्या पावसाचा जोर जिल्ह्यात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परतीचा पाऊस रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी योग्य असला तरी पाण्याचा साठा किती प्रमाणात जलाशय, शेततळी व धरणात होणार आहे त्यावरच रब्बीच्या पिकांचा जोर रहाणार आहे. परतीचा पाऊस आले व हळदीला तितकासा पोषक नाही. कारण पावसाच्या आधी जमिनीत जी ताप होती ती हळूहळू गार न होता पावसाच्या जोरामुळे ही पिके कुजून जाण्याची शक्‍यता असते.

हा पाऊस ज्यांनी सोयाबीन, घेवडा, मका, ज्वारी काढली आहे व ज्यांना परत पेरणी करायची आहे म्हणजेच फलटण, माण, खटाव या भागात ज्वारी पेरणीसाठी अनुकूल आहे. त्यानंतर सातारा, कोरेगाव, पाटण या भागात ज्वारीची लागण केली जाते. या पावसानंतर तो किती प्रमाणात पडतो यावर गहू व हरभरा यांचे पीक अवलंबून असते. यावर्षी या पावसामुळे थंडीचे प्रमाण अधिक जाणवले तर गव्हाचे पीक चांगले येईल असेही जाणकारांचे मत आहे. त्याचप्रमाणे हा पाऊस ज्यांचा ऊस नोव्हेंबरमध्ये तोडणीस येणार त्यांनाही पोषक आहे. परंतु नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याने ऊस जमिनीवर पडला आहे. थोडक्‍यात, रब्बी पिकांसाठी आत्ता पडणारा पाऊस लागवडीसाठी योग्य आहे. पावसाचे पाणी शेतकरी कसे साठवतो यावर खरीपात झालेले नुकसान थोड्या फार प्रमाणात तो भरुन काढेल.

Leave A Reply

Your email address will not be published.