नगर, (प्रतिनिधी) – येथील इंडो-आयरीश जनरल ॲण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता केंद्रीय दळणवळणमंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. अत्याधुनिक आरोग्यसेवेला विश्वास व सामाजिक बांधिलकीची जोड देणार असल्याची माहिती डॉ. दिलीप जोंधळे यांनी दिली.
या सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम भय्या जगताप, मा. मंत्री आ.बबनराव पाचपुते, मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे आदी उपस्थित राहणार आहेत.
अत्याधुनिक आरोग्यसेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देत आरोग्यसंपन्न, आनंदी समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. आयर्लंड येथे तब्बल ३३ वर्षे वैद्यकीय सेवा देणारे डॉ.दिलीप जोंधळे हे मूळचे संगमनेर आश्वी येथील आहेत. आयर्लंड येथे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू करून आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा देत मोठा नावलौकिक मिळवला.
आता नगरमध्येही इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठांसाठी सेंटर सुरु करण्यात येणार आहे. मधुमेहानंतरच्या हृदयरोग, किडनी विकार, गँगरीन सारख्या गुंतागुंतीच्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी डायबेटिक डे केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. उतारवयातील स्मृतीभ्रंशासारख्या समस्यांवरही विशेष उपचारा बरोबरच, हाडे ठिसूळ होतात.
यावर बोन डेन्सिटीसारख्या तपासण्या करून वृध्दांवर उपचार केले जातील. तपोवन रोडवर ६ एकर जागेत ९० हजार स्क्वेअर फूटचे सहा मजली प्रशस्त असे इंडो आयरिश हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहे. यामध्ये १७० बेडस असून ५० बेडचा सुसज्ज आयसीयू आहे. बालरूग्ण तसेच नवजात शिशुंसाठी आयसीयु बेडची स्वतंत्र व्यवस्था आहे.
हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसीन, मधुमेह, वृध्दापकाळ, कार्डिओलॉजी, मूत्रविकार, स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण, बालरोग, नवजात शिशु, अस्थिरोग, जनरल सर्जरी, कान,नाक,घसा, फिजिओथेरपी, फार्मसी, रेडिओलॉजी, स्वत:चा अत्याधुनिक पॅथोलॉजी तपासणी विभाग आहेत. पक्षाघात, मेंदू शस्त्रक्रिया, शारीरीक दुखापत, हार्ट सर्जरी झालेल्या रूग्णांसाठी रिहॅबिलिटेशन सेंटरही येथे असणार आहे.
उच्च दर्जाची कार्डियाक कॅथलॅब, ऑर्थोपेडिक, जनरल सर्जरी, डोळे, कान, नाक,घसा, दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सर्जिकल ऑपरेशन थिएटर हॉस्पिटलमध्ये आहे. एक मजला पूर्णत: आई व बाळासाठी असेल. डिलिव्हरीवेळी महिलांना बी.पी.वाढणे, मिरगी येणे असे प्रकार होतात. यासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर व संलग्न आयसीयुची व्यवस्था आहे.