अभियानात लौकिक पण, 538 शाळा शौचालयाविना स्वच्छता

संतोष पवार
सातारा  – स्वच्छता अभियानात देशभर नावलौकिक मिळवलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या 538 शाळांमध्ये शौचालयेच नसून या शाळांनी नवीन शौचालयांची मागणी केली आहे. 816 शाळांनी शौचालय दुरुस्तीची मागणी केली आहे. याबाबत सदस्यांनी अनेकदा आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता अभियानात विविध पुरस्कार मिळवून सातारची वेगळी ओळख निर्माण करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शौचालयांबाबत पुढाकार कधी घेणार असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्हा परिषदेने स्वच्छ ग्रामयोजना, हागणदारीमुक्त ग्रामयोजना आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. या कामांमुळे अनेक गावे राज्यभर तसेच काही देशपातळीवरही चमकली. धामणेर, आसगाव, कातळगेवाडी, मान्याचीवाडी, लोधावडे, निढळ आदी गावे पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक येतात. स्वच्छता अभियानाची प्रभावी जनजागृती करुन प्रत्येक कुटुंबाला शौचालय देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पाच लाख 14 हजार कुटुंबे शौचालये वापरत आहेत. मात्र, जिथून शिक्षणाचा पाया रचला जातो, अशा प्राथमिक शाळांमध्ये शौचालयांबाबत दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार 694 शाळा असून त्यापैकी 286 शाळांनी मुलांच्या शौचालयासाठी तर 252 शाळांनी मुलींच्या शौचालयासाठी मागणी केली आहे. जावळी 34, कोरेगाव 26, खंडाळा 32, खटाव 51, माण 48, महाबळेश्‍वर 3, पाटण 124, फलटण 76, सातारा 65, वाई 33 व कराड तालुक्‍यातील 46 शाळांकडून नवीन शौचालयाची मागणी आहे. त्याचबरोबर जावळी 15, कोरेगाव 77, खंडाळा 76, खटाव 45, माण 157, महाबळेश्‍वर 23, पाटण 143, फलटण 118, सातारा 62, वाई 27, कराड 73 अशा 816 शाळांनी शौचालय दुरुस्तीची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालये असणे गरजेचे असल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांनी आवाज उठवला आहे. माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत सकारात्मक पावले उचलली होती. मात्र, पदाधिकारी बदलानंतर हा प्रश्‍न प्रलंबित राहिला आहे. विद्यमान अध्यक्ष उदय कबुले यांनीही शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले असल्याने ते याबाबत पुढाकार घेतील, अशी अपेक्षा आहे.

सातारा जिल्हा परिषदेने स्वच्छता अभियानात केलेली कामाची दखल देशपातळीवर घेतली. जिल्हा परिषदेला विविध पुरस्कार मिळाले ही निश्‍चितच अभिमानस्पद बाब आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत सातत्याने सभांमध्ये आवाज उठवला. जिल्हा परिषदेने याबाबत पुढाकार घेऊन जिल्ह्याचा नावलौकिक कायम राखण्याची गरज आहे.

धैर्यशील अनपट, सदस्य, जिल्हा परिषद, सातारा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.