पिंपरी – काही दिवसांपूर्वीच पवना नदीत मृत मासे आढळले होते. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पवना नदी फेसाळली आहे. याबाबत महापालिका आणि महावितरण केवळ नोटीसचा कागदी खेळ गेल्या काही वर्षांपासून खेळत आली आहे. याबाबत थेट खासदार यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देऊन जनहित याचिकेचा इशारा देखील दिला आहे. तरीही याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही. शहरात विविध ठिकाणी सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात असून असाच प्रकार पिंपळे सौदागर समोर आला आहे. येथे बंदिस्त केलेल्या नाल्यातून उच्चभ्रू परिसरातील सांडपाणी थेट नदीत जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
सिमेंटच्या जंगलात पिंपळे सौदागर येथे फक्त चार नाले शिल्लक राहिले असून त्यांनाही सिमेंटचे पाइप टाकून बंदिस्त केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जागेचा इमारती व रस्त्यासाठी वापर केले जात आहे. शिवाय या सिमेंटच्या पाइपमधून सांडपाणीही नदीत सोडले जात आहे. मागील काही दिवसात प्रदुषित पाण्यापुळे पवना नदी चार वेळा फेसाळली होती. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच खासदार बारणे यांनी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव व महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
या नाल्यातून सांडपाणी थेट पवनेत
1) शिवम सोसायटी खालून वाहत येणारा हा “रहाटणीगाव नाला’ म्हणून महापालिकेत नोंद असलेला नाला महादेव मंदिराजवळ पवना नदीला मिळतो. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर वाहत येणारे सांडपाणी थेट नदीत जात आहे. तसेच पवना नदीतही या नाल्यात कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.
2) जैन मंदिरासमोरील पवना नदीला मिळणारा नाला सिमेंट पाइपने बंदिस्त केला असून परिसरातील सांडपाणी वाहिन्या या पाइपला जोडल्या आहेत. त्यामुळे मैला मिश्रित पाणी नदीत जात आहे.
3) काटे वस्तीमधील कुंजीर कॉलनीत नाल्यात कॉंक्रिटीकरण करण्यात आले असून काही अंतरानंतर हा नाला लुप्त होतो. त्यातही सांडपाणी सोडल्याचे दिसत आहे. त्या नाल्यातील पाणी पुढे पावसाळी वाहिनीतून थेट नदीत जाते.
महापालिकेला न कळवता काही लोक सांडपाणी वाहिन्या नाल्याला जोडतात. नाल्यांमध्ये जाणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतरही पुढील कारवाई करण्यात येईल.
– विजय जाधव, उपअभियंता, जलनिस्सारण विभाग
नाल्यातून पवना नदीपात्रात येणाऱ्या सांडपाण्याची तातडीने माहिती घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देणार आहे. थेट नदीत सांडपाणी सोडणे कायद्याने बंदी असून शहरातील पावसाळी जलवाहिन्यांना जोडणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांची पाहणी सुरू आहे.
– संजय कुलकर्णी, संयुक्त नगर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका