श्रीगोंदा -श्रीगोंदा येथील कारागृहात असणाऱ्या 36 आरोपींना करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर येथील पोलीस कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्यात आली. यामध्ये 7 पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच 45 जणांची तपासणी बाकी आहे.
येथील उपकारागृहतील काही आरोपींना ताप आल्याने त्यांची करोना तपासणी करण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घेतला. सर्व आरोपींची तपासणी करण्यात आली. यातील 36 आरोपींना कोरोनाची बाधा झाल्याचे या तपासणी अहवालात समोर आले. आरोपींच्या संपर्कात असलेले पोलीस कर्मचारी व जेवण देणारे कामगार यांची देखील तपासणी करून घ्यावी, अश्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी केल्या. त्यानुसार 25 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. 25 मधील सात कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अद्याप 40 कर्मचाऱ्यांची तपासणी होणे बाकी असल्याने पोलीस ठाणे व त्यांच्याशी संबंधित कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्या चिंतेत भर पडली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची देखील तपासणी होणार असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.