शिक्रापूर -येथील ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर पाच पाच वर्षे एक पद भूषविले जात होते. शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीत पदाधिकाऱ्यांना सध्या पदांचे ग्रहण लागले आहे. पदांसाठी अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल असे चार दिवस तुझे, चार दिवस माझे, असे पद पदाधिकारी भूषवित आहेत.
शिक्रापूर ही शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत इमारतीच्या उभारणीपासून अनेक मोठमोठ्या घडामोडी येथे घडल्या आहेत. तर अनेक मोठमोठे राजकीय पदाधिकारी, अनेक मंत्र्यांनी या ग्रामपंचायतीला भेट दिली आहे. पाच वर्षापूर्वी या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी उलाढाल होऊन ग्रामपंचायतीत दोन्ही गटांचे आठ आठ सदस्य तर एक अपक्ष सदस्य निवडून येत सत्ता पालट झाली.
यावेळी अनेकांनी सरपंच, उपसरपंच होण्यासाठी ताकद पणाला लावली होती. यावेळी मोठी उलाढाल होत सत्ता विरोधी गटाकडे गेली. 2017 मध्ये तत्कालीन सरपंच महिलेने राजीनामा दिला आणि ग्रामपंचायतची सत्ता पुन्हा पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांकडे गेली. त्यांनतर सरपंच एका गटाचा आणि उपसरपंच दुसऱ्या गटाचा असे चित्र निर्माण झाले.
सप्टेंबर 2019 मध्ये 2015 साली झालेल्या उपसरपंचाने राजीनामा दिला आणि इतर सर्व सदस्यांना उपसरपंच होण्याची स्वप्ने पडू लागली. कित्येक दरम्यानच्या काळामध्ये सत्ताधारी गटातील एक सदस्य विरोधी गटाला मिळाला आणि पुन्हा विरोधी गटातील महिला उपसरपंच झाली. त्या महिलेच्या उपसरपंच पदाच्या राजीनाम्यानंतर पदांची एक शर्यत सुरू झाली.
त्यानंतर ग्रामपंचायतीला इतिहासात प्रथमच 5 सरपंच मिळाले असून त्यापैकी दोन उपसरपंचांनीच प्रभारी सरपंचपद भूषविले आहे. 7 उपसरपंच पद मिळालेले असून सध्या उपसरपंच पद रिक्त आहे. या ग्रामपंचायतीत सध्या पदांसाठी खुर्चीचा खेळ सुरू असलेला दिसून येत आहे.
एकीकडे शुभेच्छा; दुसरीकडे नारळ –
अलीकडच्या काळात उपसरपंचपद भूषविणाऱ्यांना एखाद्या चित्रपटाला शोभेल असे अगदी चार दिवस, सात दिवसांचे उपसरपंचपद मिळालेले आहे. नवीन उपसरपंच निवड झाल्यानंतर त्याबाबत शुभेच्छा फलक लावलेले असतानाच उपसरपंचांचा राजीनामा घेत नारळ दिला जात आहे. तर शिक्रापूर ग्रामपंचायतच्या इतिहासातील पहिल्याच पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी झाले असून शिक्रापूरला पदांचे ग्रहणच लागले असल्याचे दिसून येत आहे.
अपक्ष सदस्याला सरपंच, उपसरपंच पदांचा मान –
शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणूकीत एक अपक्ष सदस्य निवडून आला आहे. या सदस्याला एका गटाकडून उपसरपंचपद मिळाले. दरम्यान तत्कालीन सरपंच यांनी राजीनामा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रक्रियेत काही महिने सरपंच पदाची निवडणूक लांबणीवर गेली. यावेळी अपक्ष सदस्याला प्रभारी सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. साडेतीन महिने प्रभारी सरपंचपद भूषवित चक्क अपक्ष सदस्याला सरपंच व उपसरपंच दोन्ही पदांचा मान मिळाला.