नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिल्लीतील कोरोनाच्या स्थितीबद्दल आज बैठक झाली. कोरोना व्यवस्थापनासंदर्भात शाह यांनी पाच दिवसांत चौथ्यांदा बैठक घेतली आहे.
कोरोना रूग्णांना सुविधा मिळत नसल्याच्या आणि वाढत्या संक्रमणामुळे व मृतदेह कचराकुंडीत सापडल्याच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिल्ली सरकारला फटकारले. त्यानंतर शाह यांनी दिल्लीत लक्ष द्यायला सुरवात केली आहे.
यापूर्वी १४ जूनला दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल आणि केजरीवाल यांच्याशी शाह यांनी दीड तास चर्चा केली. आयसॉलेशन वॉर्डमध्ये रुपांतरित झालेल्या रेल्वेचे ५०० डबे वापरण्यासाठी दिल्लीला मंजुरी देण्यात आली. तसेच कोरोना चाचणी तिप्पट करण्याचे व ६०% राखीव बेड खासगी रुग्णालयांमध्ये कमी दराने उपलब्ध करून देण्याचे ठरले.
केजरीवाल यांच्या भेटीनंतर शहा यांनी त्याच संध्याकाळी दिल्लीतील सर्व महापौरांशी मनपा स्तरावरील रणनीतीवर भाषण केले. या तीन महापौरांनी सांगितले की, ते कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत आणि दिल्ली सरकारला सुविधा उपलब्ध करुन देण्यास तयार आहेत.
त्यानंतर १४ जून’ला शाह यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. कोरोना चाचणी खर्च ५०% कमी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, आज सुद्धा शहा दिल्लीत बैठक घेत आहेत.