विधायक : ओंकार तरुण मंडळामुळे झोपड्यांमध्ये लखलखाट
लोणावळा – आयुष्याच्या पाचवीला पूजलेले चारी विश्व दारिद्य्र आणि त्यात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने दाणादाण उडविली. त्यामुळे नुकसानग्रस्त फणसराई आणि वनाटी येथील आदिवासी कुटुंबाच्या अंधाऱ्या झोपड्या प्रकाशमान करण्याचे कार्य तुंगार्ली येथील ओंकार तरुण मंडळाच्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.
चक्रीवादळाने लोणावळा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात वसलेल्या राजमाची आणि परिसराला चांगलाच तडाखा बसला. अनेकांची घर यात होत्याची नव्हती झाली, तर अनेकांच्या घरांची छपरे वाऱ्यासोबत गायब झाली. काही आदिवासींच्या झोपड्या तर अक्षरशः पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेल्या. अशामध्ये या आदिवासी नागरिकांच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे येत असताना तुंगार्ली गावातील समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या ओंकार तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील या आदिवासींच्या मदतीसाठी आपले हात पुढे केले.
ओंकार तरुण मंडळाच्या वतीने फणसराई आणि वनाटी येथील सर्व कुटुंबांना सोलारवर चालणारे आणि मोबाइल चार्ज करणारे दिवे देण्यात आले. यामुळे या आदिवासी कुटुंबांना रात्रीच्या अंधारात रॉकेलचे दिवे सांभाळत उजेडासाठी करावी लागणारी धडपड बंद झाली. सोबतच या प्रत्येक कुटुंबाला धान्याचे किट, दोन ब्लॅंकेटचे आणि लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धनकवडे, मंडळाचे सदस्य नगरसेवक राजू बच्चे, जयंत गोसावी, ज्ञानेश्वर येवले, किशोर पवार, सतीश गावडे, किरण येवले, हरीलाल बोरकर, सुनील अंबुरे, नितीन गायकवाड, विजय येवले, प्रसाद मावकर, विशाल पाडाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.