सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात पाच रुग्ण पाँझिटिव्ह आले. जिल्ह्यात ८१ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर १३० जणांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा. दहिवडी येथे कोविड केंद्रात दाखल असणाऱ्या अहमदाबाद येथून प्रवास करुन आलेल्या एका २५ वर्षीय पुरुष व कराड येथील सैदापूर कोविड केंद्रात दाखल असणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचा अशा २ जणांचे करोनाबाधित अहवाल प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २४, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ५१, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील १५, फलटणच्या ग्रामीण रुग्णालयातील ७, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील १८, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील १५ अशा एकूण १३० जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ४ व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ७७ अशा एकूण ८१ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 124 झाली असून या पैकी ८७ रुग्ण उपचार घेत आहेत, ३५ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. करोनाबाधित दोघांचा मृत्यु झाला आहे.