कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी येथील करोना रुग्णाच्या संपर्कातील 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना होम क्वॉंरंटाइन करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक अभिजित चव्हाण यांनी दिली. त्रिपुटी येथील ट्रकचालकाचा करोना रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह अन्य संपर्कातील अशा 23 जणांना क्वॉंरंटाइन करण्यात आले होते. त्या सर्वांच्या तपासणीचे रिपोर्ट मंगळवारी दुपारी आले असून ते सर्व निगेटिव्ह असल्याचे ग्रामस्थांना कळविण्यात आले.
मात्र, सर्वांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांनी काळजी घ्यावी, बाहेर जाऊ नये,म्हणून आवश्यक समुपदेशन आरोग्य विभाग व पोलिसांनी केले आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने गावात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे सरपंच सिंधू काटकर, पोलीस पाटील सुषमा शेडगे, उपसरपंच यमाजी कुंभार यांनी सांगितले. त्रिपुटी येथील 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे.