संगमनेर – करोनाने थैमान घातले असून दररोज वाढणाऱ्या रुग्णांमुळे संगमनेरकर चिंतेत आहेत. आज (दि.12) तालुक्यात सात नवीन करोनाचे रुग्ण सापडले असून तालुक्यातील रुग्णांची संख्या 80 झाली आहे. तसेच एका खासगी हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला.
संगमनेरसाठी गुरुवारचा दिवस दिलासादायक ठरला होता. गुरुवारी संगमनेरमध्ये नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्थ सेंटरमधून चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता, त्यात दीड वर्षाच्या मुलाचा समावेश होता. मात्र शुक्रवारी पुन्हा सात नवीन करोनाबाधित आढळल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे.
आज तालुक्यातील निमोण येथील एकाच कुटुंबातील तिघेजण करोनाबाधित सापडले असून यात 14 वर्षीय मुलगी, 18 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर संगमनेर शहरातील दातेमळा येथील 38 वर्षीय महिला, मोगलपुरा येथील 48 वर्षीय महिला, लखमीपुरा येथील 32 वर्षीय महिला, तर 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यातील बधितांची संख्या 80 वर पोहचली असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना रुग्णांमुळे संगमनेरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एका अवैध व्यवसायिकाच्या संपर्कातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलीगिकरणात ठेवण्यात आले होते.
त्यामुळे साळीवड्यातील त्या तरुणाच्या आईवडिलांसह त्याची पत्नी, एक मुलगी व एक चार महिन्याचे बाळाचे एका खाजगी हॉटेलमध्ये विलगिकरण करण्यात आले होते. मात्र गुरुवारी रात्री बाळाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यापूर्वी त्या बाळासह कुटुंबाचा करोना अहवाल निगेटिव्ह आले.